Nagpur: अमृत काळात देशाच्या विकासासाठी युवकांची भूमिका मोलाची, देवेंद्र फडणवीस य़ांचं विधान
By कमलेश वानखेडे | Published: January 20, 2024 06:08 PM2024-01-20T18:08:27+5:302024-01-20T18:09:01+5:30
Devendra Fadnavis News: आपला देश हा आता अमृत काळातून जात आहे. २०३५ पर्यंत देशातील तरुणांची संख्या सर्वाधिक असेल. हा काळ हा देशाची दिशा ठरविणारा असेल. त्यामुळे अमृत काळात देशाच्या विकासात युवकांची भूमिका मोलाची राहणार आहे, असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
- कमलेश वानखेडे
नागपूर - आपला देश हा आता अमृत काळातून जात आहे. २०३५ पर्यंत देशातील तरुणांची संख्या सर्वाधिक असेल. हा काळ हा देशाची दिशा ठरविणारा असेल. त्यामुळे अमृत काळात देशाच्या विकासात युवकांची भूमिका मोलाची राहणार आहे, असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
रामदासपेठ येथील हॉटेल सेंटर पॉईंट येथे शनिवारी ‘मनी बी इन्स्टिट्यूट’मार्फत अमृत काळ आणि गुंतवणुकीवर आधारित चर्चासत्राच्या समारोपप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या कार्यक्रमाला पहिल्या समारोपीय सत्रात केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी संबोधित केले. यावेळी मनी बी इन्स्टिट्यूटच्या संयोजक शिवानी दाणी-वखरे, आशुतोष वखरे, स्टॉक मार्केट तज्ञ एस. पी. तुलसीयन, विजय केडिया, अभिमन्यू तुलसियन उपस्थित होते.
यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, जगातील वेगाने विकसित होणारी भारताची अर्थव्यवस्था आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पुढील पाच वर्षात भारताला पहिल्या तीन अर्थव्यवस्थेत आणण्याचे स्वप्न पाहिले आहे. विकसित देशाकडे भारताची वाटचाल सुरू आहे. जगाला भारताकडे पाहून मार्केट समजाऊन घ्यावे लागेल. इथे १४० कोटी खरेदीदार आणि व्यवहार देखील आहे. ११ व्या क्रमांकावरून देशाची अर्थव्यवस्था ५ व्या क्रमांकावर आली आहे. लवकरच ती तिस-या क्रमांकावर आणण्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वप्न पाहिले आहे. हे स्वप्न पूर्णत्वास आणण्यासाठी नवीन तंत्रज्ञान तसेच कालानुरूप अर्थसाक्षर होण्याची गरज आहे.
अर्थव्यवस्थेचा विस्तार देशातील १०० पूंजीपती करू शकतात. पण ते सर्वांगीण विकास करू शकत नाही.व्यक्तीच्या विकासातून जीडीपीचा विकास करणे हा पंतप्रधान मोदी यांचा फार्म्युला आहे. ११ कोटी शौचालय, ५ कोटी लोकांना घर मिळाल्याने त्यासंबंधी क्षेत्र विकसित होतेय त्यातून रोजगार निर्मित होते. २५ कोटी लोक देशातून गरिबीतून मोदींनी बाहेर आणले. तंत्रज्ञानाचा वापर करून हा विकास शक्य झाला, असेही त्यांनी सांगितले.
समृद्धी महामार्गासाठी ५० हजार कोटींचे ऑफर
उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मी समृध्दी महामार्ग तयार करत असताना माझ्या वर टीका केली जायची. या रोड ची आवश्यकता आहे का, असे प्रश्न विचारायचे. पण आज या महामार्गाचे ५० किमीचे काम बाकी असतानाही माझ्याकडे ५० हजार कोटींचे ऑफर आले आहेत. हा महामार्ग पूर्ण झाल्यावर ही ऑफर ७० हजार कोटींपर्यंत जाईल, असेही त्यांनी सांगितले.
निवृत्ती नंतर सरकारच्या भरोश्यावर राहता येणार नाही
खासगी क्षेत्रात पेन्शन ची कन्सेप्ट नाही. त्यामुळे त्याचे नियोजन करताना आजच स्मार्ट नियोजन करावे लागेल. निवृत्ती नंतर सरकारच्या भरोश्यावर राहता येणार नाही. निवृत्ती नंतर आवश्यक पैसा कसा येईल याचे नियोजन आताच करावे लागेल, असा सल्लाही फडणवीस यांनी दिला.