तिचा ‘प्रवास’ घरातून समृद्धीकडे... आयुष्याच्या परीक्षेतही गोल्ड मेडलच!
By जितेंद्र ढवळे | Published: June 9, 2023 11:02 AM2023-06-09T11:02:49+5:302023-06-09T11:04:12+5:30
गृहउद्योगातून स्वप्नपूर्ती : देवळीच्या कोमल ढगे हिची यशोगाथा
नागपूर : घरी आलेल्या पाहुण्यांनी लोणच्याचे कौतुक केले! कुटुंबीयांनी पाठबळ दिले. यातच नोकरीसाठी आणखी किती दिवस प्रतीक्षा करायची यामुळे भावाच्या घरीच गृहउद्योग सुरू केला. आज वार्षिक ५ ते ५.५० लाखांचा टर्नओव्हर आहे. तो वाढेलही. सोबत दहा महिलांना रोजगारही दिला. ही यशोगाथा आहे नागपूर ग्रामीण तालुक्यातील देवळी गुजर येथील गोल्ड मेडलिस्ट कोमल ढगे हिची!
राज्यशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतलेली कोमल गोल्ड मेडलिस्ट आहे. नागपुरातील बिंझाणीनगर महाविद्यालयात तिचे शिक्षण झाले आहे. तिथे डॉ. अलका देशमुख यांच्या मार्गदर्शनात तासिका तत्त्वावर प्राध्यापक म्हणून नोकरी मिळाली. मात्र, कोविडमुळे आलेल्या लॉकडाऊनने यात खोडा आणला. नवीन नोकऱ्यांची संधी नाही. त्यामुळे आपण उच्चशिक्षण घेतले असून, शांत न बसता काही तरी केले पाहिजे, असा संकल्प कोमल हिने केला.
याला पती मुकेश मेश्राम, भाऊ विवेक ढगे आणि कुटुंबीयांनी पाठबळ दिले. देवळी गुजर येथे भावाच्या घरीच असलेल्या गोडाऊनमध्ये लोणचे व मुरब्बा प्रक्रिया उद्योगाला सुरुवात केली. जेमतेम भांडवल असल्यामुळे उद्योगाचा विस्तार करणे शक्य नव्हते. यानंतर प्रधानमंत्री सूक्ष्म प्रक्रिया उद्योग योजनेची उमेद व कृषी विभागाकडून माहिती मिळाली. त्यानुसार बुटीबोरी येथील बँक ऑफ इंडिया शाखेतून १० लाखांचे कर्ज मिळाले. या योजनेतून लेमन क्रशर, रॉ मँगो कटिंग, पिकल मिक्सर, पिकल फिलिंग पॅकिंग मशीन त्यासोबतच बॅच कोडिंग ही यंत्रसामुग्री खरेदी केली. अत्याधुनिक यंत्रामुळे उत्पादनात वाढ झाली.
पाच किलोपासून दोन टनांपर्यंत
सुरुवातीला घरी पाच किलो लोणचे तयार करून गृहउद्योग सुरू करणाऱ्या कोमल आज महिन्याला दोन टन लोणचे आणि मुरब्ब्याची विक्री करतात. त्यांची लोणचे आणि मुरब्बा करण्याची प्रक्रिया हायजेनिक असल्याने ती उत्पादने येथील ग्राहकांच्या पसंतीस उतरली.
२५ प्रकारची लोणची
‘प्रवास’ गृहउद्योगात २५ प्रकारची लोणची तयार केली जातात. यात आंबा, लिंबू, करवंद, गाजर, कारले, मेथी आदींचा समावेश आहे. कारले आणि मेथीच्या लोणच्याला मधुमेहींकडून जास्त मागणी आहे.
...असा आहे प्रवास
‘प्रवास’ इंडस्ट्रीजला काॅर्पोरेट लूक देण्यासाठी कोमल यांनी खापरीच्या कृषी विज्ञान केंद्र येथे लोणचे निर्मितीचे प्रशिक्षण घेतले. याला राज्य सरकारच्या ‘उमेद’ अभियानाचे, तसेच कृषी विभागाच्या ‘आत्मा’ प्रकल्पाचे बळ मिळाले. यासोबतच ‘वन स्टेशन, वन प्राॅडक्ट’ योजनेंतर्गत नागपुरातील अजनी रेल्वेस्थानकावर ‘प्रवास’निर्मित लोणचे आणि मुरब्ब्याच्या मार्केटिंगसाठी व्यासपीठ मिळाले. अलीकडेच कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी कोमल यांच्या ‘प्रवास’ या गृहउद्योगाला भेट दिली व कोमल यांच्या भरारीचे कौतुक केले.
उच्चशिक्षण घेतल्यानंतर नोकरी मिळावी, अशी प्रत्येकाची अपेक्षा असते. माझीही होती. शेवटी मात्र कोविडनंतरच्या अस्थिर परिस्थितीमध्ये नोकरीवर अवलंबून न राहता गृहउद्योग सुरू केला.
- कोमल ढगे, देवळी गुजर