भाविकांनो, ३८५ रुपयांत चला नागद्वार यात्रेला; आजपासून एसटीची नागपूरहून पचमढीसाठी विशेष सेवा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2023 02:17 PM2023-08-11T14:17:47+5:302023-08-11T14:18:20+5:30
भाविकांची होणार मोठी गर्दी, १९ बसेस बुक
नागपूर : ठिकठिकाणच्या कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पचमढीच्या नागद्वार यात्रेला यंदा भाविकांची विशेष गर्दी होण्याचे संकेत मिळाले आहेत. यात्रा सुरू होण्यापूर्वीच एसटी महामंडळाच्या १९ बसेस भाविकांनी बुक केल्या आहेत. दरम्यान, नागद्वार यात्रेसाठी भाविकांची गर्दी होण्याचे संकेत मिळाल्याने एसटी महामंडळाने यंदा रोज २१ बसेस चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
११ ऑगस्टपासून नागपूर-पचमढी-नागपूर अशी ही यात्रा स्पेशल बस राहणार आहे. मध्य प्रदेशमधील डोंगराच्या कुशित पचमढीला नागद्वार देवस्थान असून, येथे दरवर्षी श्रावणात मोठी यात्रा भरते. कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या पवित्र ठिकाणी दरवर्षी ऐन पावसांत भाविक यात्रेसाठी गर्दी करतात. यंदाही येथील यात्रेसाठी भाविकांची मोठी गर्दी होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. नागपूर विभागातून भाविकांनी नागद्वार यात्रेसाठी ११ ऑगस्टला ६ बसेस, १२ तारखेला ८ तर, १३ ऑगस्टला ५ बसेस बुक केल्या आहेत.
यात्रेकरूंचा हा प्रतिसाद बघता एसटी महामंडळाने भाविकांसाठी विशेष बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, ११ ते २२ ऑगस्टदरम्यान गणेशपेठ आगारातून ८, घाटरोड आगारातून ८ आणि इमामवाडा आगारातून ५ अशा रोज २१ बसेस नागपूरच्या गणेशपेठ बसस्थानकावरून चालविण्याचे नियोजन केले आहे. त्याच बसेस भाविकांना परतही घेऊन येणार आहेत. त्यासाठी एका बाजूचे केवळ ३८५ रुपये तिकीट भाडे आहे. त्यामुळे ७७० रुपयांत प्रवाशांना नागपूरहून पचमढीची नागद्वार यात्रा (जाणे आणि परत येणे) घडणार आहे.
-प्रत्येक अर्ध्या तासाने बस उपलब्ध
नागपूरहून जाण्यासाठी आणि परत येण्यासाठी दर अर्धा तासानंतर बस उपलब्ध असल्याचे गणेशपेठचे आगारप्रमुख गाैतम शेंडे यांनी कळविले आहे. बसमध्ये होणारी गर्दी लक्षात घेता एसटीकडून गणेशपेठ तसेच पचमढी येथे सिट बुक (आरक्षण) करण्याची व्यवस्थाही करण्यात आल्याची माहिती शेंडे यांनी दिली आहे.