महादेवा जातो गा... नागपूर-पचमढी यात्रेसाठी भाविकांची गर्दी

By नरेश डोंगरे | Published: March 2, 2024 08:08 PM2024-03-02T20:08:24+5:302024-03-02T20:09:10+5:30

आंभोरालाही एसटीची यात्रा स्पेशल : लेकुरवाळीची उत्साहात धावपळ

devotees throng for nagpur pachmarhi yatra | महादेवा जातो गा... नागपूर-पचमढी यात्रेसाठी भाविकांची गर्दी

महादेवा जातो गा... नागपूर-पचमढी यात्रेसाठी भाविकांची गर्दी

नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : महाशिवरात्री यात्रेसाठी एसटी महामंडळाने नागपूर पचमढी अशा खास 'यात्रा स्पेशल बस' गाड्या शुक्रवारपासून सुरू केल्या असून, या गाड्यांना भाविकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे लेकुरवाळी, लालपरी अशी बिरूद घेऊन मिरवणाऱ्या एसटी बसेस भरभरून धावताना दिसत आहे. सोबतच आंभोरा यात्रेसाठीदेखिल एसटीने यात्रा स्पेशल बसेसचे नियोजन केले आहे.

मध्यप्रदेशातील पचमढी येथे दरवर्षी महाशिवरात्री निमित्त भव्य अशी यात्रा भरते. महादेवाचे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्रासह विविध प्रांतातील भोले भक्त लाखोंच्या संख्येने पचमढीला पोहचतात. विदर्भातील भाविकांचीही मोठी गर्दी असते. यंदा ८ मार्चला महाशिवरात्री आहे. अर्थातच त्या दिवशी मिळेल त्या वाहनांनी लाखो भाविक पचमढी चाैरागड येथे पोहचतात. त्यांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाच्या नागपूर विभागाने यावर्षी १ मार्चपासूनच नागपूरहून पचमढीसाठी २१ बसेसचे नियोजन केले. ईकडून रोज अर्धा तासाने पचमढीची बस गणेशपेठ आगारातून सोडली जाणार असून पचमढीहून नागपूरकरितादेखिल अशीच व्यवस्था करण्यात आली आहे. शुक्रवारी १ मार्चला पहिली बस सुटणार, असे एसटी महामंडळाने आधीच जाहिर केले होते. त्यामुळे मोठ्या संख्येत भाविकांनी या बसमध्ये गर्दी केली. या सर्व अतिरिक्त गाड्यांचे नियोजन गणेशपेठ, ईमामवाडा, घाटरोड, वर्धमाननगर आगारातून करण्यात आले आहे.

अंभोरा यात्रेसाठी १२३ गाड्यांचे नियोजन

पचमढी प्रमाणेच श्री क्षेत्र अंभोरा येथील महाशिवरात्री यात्रेसाठी ८ आणि ९ मार्चला १२३ गाड्या चालविण्याचे नियोजन एसटी महामंडळाच्या नागपूर विभागाने केले आहे. विदर्भातील सुप्रसिद्ध शिवालयांपैकी आंभोरा शिवक्षेत्रही सर्वत्र सुप्रसिद्ध आहे. आंभोरा येथे ठिकठिकाणचे भाविक दर्शनाला येतात. येथे भाविकांच्या सोयीसाठी ८ आणि ९ मार्चला वर्धमाननगर आगारातून ३०, इमामवाडा आगारातून २५, उमरेड २२, घाटरोड आगारातून २९, रामटेक १२ आणि सावनेर ५ अशा एकूण १२३ एसटी बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे.

भाविकांचा प्रतिसाद उत्साहवर्धक

शुक्रवारपासून सुरू करण्यात आलेल्या पचमढी यात्रा स्पेशल गाडीला भाविकांकडून मिळणारा प्रतिसाद उत्साहवर्धक असल्याचे एसटीचे उपमहाव्यवस्थापक श्रीकांत गभणे यांनी म्हटले आहे. पचमढी, आंभोराशिवाय वाकी येथील हजरत बाबा ताजुद्दीन दर्गाह येथेदेखिल उर्सनिमित्त एसटीच्या ४० गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. ६ मार्च उर्सचा प्रमुख दिवस आहे. त्यानिमित्त ३ मार्चपासून ९ मार्च २०२४ पर्यंत एसटीच्या यात्रा स्पेशल गाड्या सुरू राहिल, अशी माहिती गणेशपेठ आगार प्रमूख गाैतम शेंडे यांनी दिली आहे.
 

Web Title: devotees throng for nagpur pachmarhi yatra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.