१० वर्षे नगरसेवक, ५ वर्ष स्थायी समितीचे होते अध्यक्ष; मात्र आज करताय वॉचमनची नोकरी!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2021 10:39 AM2021-03-19T10:39:28+5:302021-03-19T11:00:58+5:30

देवराम तिजोरे हे १० वर्ष नागपूर महापालिकेचे नगरसेवक होते.

Devram Tijore was a corporator of Nagpur Municipal Corporation for 10 years. | १० वर्षे नगरसेवक, ५ वर्ष स्थायी समितीचे होते अध्यक्ष; मात्र आज करताय वॉचमनची नोकरी!

१० वर्षे नगरसेवक, ५ वर्ष स्थायी समितीचे होते अध्यक्ष; मात्र आज करताय वॉचमनची नोकरी!

Next

नागपूर/मुंबई: आजकाल राजकारणात एखादा नेता सरपंच, नगरसेवक जरी झाला तरी त्याचा असा थाट असतो कि बघायचं काम नाही. आलिशान फॉर्च्युनर गाड्या, हातात २-३ महागडे फोन, आलिशान घर, ऑफिस आणि सोबत नेहमीच २-४ कार्यकर्त्यांचा गराडा. पण या सर्व गोष्टीला अपवाद आहे एक अशी व्यक्ती जी १० वर्ष नागपूर महापालिकेत नगरसेवकच नाही, तर ५ वर्ष स्थायी समिती अध्यक्षपद देखील सांभाळले होते. 

आज त्या व्यक्तीला त्याच्या प्रामाणिकपणामुळे नागपुरात जिथं ट्रस्टी ते होते तिथंच चौकीदार म्हणून काम करावं लागत आहे. हि व्यक्ती आहे नागपूरचे ७२ वर्षीय देवराम तिजोरे. देवराम हे असे राजकारणी आहेत जे पैशाच्या जोरावर चालणाऱ्या राजकारणाला अपवाद ठरले आहेत.

देवराम तिजोरे हे  १९८५मध्ये काँग्रसकडून आणि २००२ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नगरसेवक म्हणून निवडून आले होते.तसेच ५ वर्ष ते स्थायी समिती अध्यक्ष देखील राहिले. शिवाय नागपूर सुधार प्रन्यासचे एक वेळचे ट्रस्टी देखील ते होते. याच देवराम  तिजोरे यांना आज कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी वॉचमन नोकरी करावी लागत आहे. ज्या नागपूर सुधार प्रन्यासचे ते ट्रस्टी होते, तिथेच ते आज वॉचमन म्हणून नोकरी करतात.

देवराम तिजोरे यांच्या आजच्या परिस्थितीला कारणीभूत आहे त्यांचा प्रामाणिकपणा आणि खऱ्या अर्थाने फक्त समाजासाठी, लोकांसाठी केलेले राजकारण. अनेक वर्ष सत्तेत असताना देखील देवराम यांनी स्वतःसाठी काहीच कमावलं नाही. त्यांनी आपल्या राजकीय कार्यकाळात फक्त लोकांचीच सेवा केली.

राजकारण हे स्वतःच्या स्वार्थासाठी नसल्याचे देवराम तिजोरे सांगतात. देवराम यांनी प्रामाणिकपणे राजकारण केले ज्यामुळे त्यांनी एक दमडीही कमावली नाही. खरं बघायला गेलं तर स्थायी समितीचा अध्यक्ष राहिलेला व्यक्ती हा आज करोडपती असला असता. पण त्या कमाईला आडवा आला देवराम तिजोरे यांचा प्रामाणिकपणा. देवराम तिजोरे आज आपल्या २ खोल्याच्या घरात राहतात. या घरामध्ये मोडकळीस आलेले फर्निचर आहे. त्यांच्याकडे एक नादुरुस्त असलेली एक मोपेड गाडी आहे. एवढीच त्यांची आज संपत्ती आहे. त्यांनी घर देखील कर्ज काढून बांधलेला असून पैशांअभावी त्याला रंगरंगोटी देखील नाही.

एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, दत्ता मेघे, सतीश चतुर्वेदी, श्रीकांत जिचकर या महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यांसोबत काम करणारे, राजकीय मंच गाजवणारे देवराम आज मात्र चौकीदार आहेत. आणि देवराम तिजोरे यांना आजच्या परिस्थितीवर खंत देखील नाही. स्वतःच्या आयुष्याची उमेदीचे वर्षे आपल्या पक्षासाठी आणि नागपूरच्या जनतेसाठी खर्ची घातली. मात्र, एकेकाळचा हा प्रामाणिक राजकारणी  देवराम तिजोरे आज उतार वयात चौकीदार म्हणून नोकरी करण्यास मजबूर आहे.

Read in English

Web Title: Devram Tijore was a corporator of Nagpur Municipal Corporation for 10 years.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.