देवता लाईफ फाऊंडेशन रक्तदानातून १ लाख पिशव्या गोळा करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:06 AM2021-07-03T04:06:27+5:302021-07-03T04:06:27+5:30
नागपूर : रक्तदानाबाबत जनजागृती करण्यासाठी ‘देवता लाईफ फाऊंडेशन’ने व्यापक मोहीम हाती घेतली आहे. यानुसार संपूर्ण महाराष्ट्रात फाऊंडेशनचा रथ फिरणार ...
नागपूर : रक्तदानाबाबत जनजागृती करण्यासाठी ‘देवता लाईफ फाऊंडेशन’ने व्यापक मोहीम हाती घेतली आहे. यानुसार संपूर्ण महाराष्ट्रात फाऊंडेशनचा रथ फिरणार असून ठिकठिकाणी रक्तदान शिबिर घेण्यात येणार आहे. महात्मा गांधी जयंतीदिन २ ऑक्टोबरपासून मोहिमेचा शुभारंभ होणार असल्याची माहिती फाऊंडेशनचे अध्यक्ष किशोर बावणे यांनी कार्यक्रमात दिली.
समाजाची उन्नती, गरजवंतांना मदत, निराधार-वृद्धांना आधार, या उद्देशाने फाऊंडेशनची स्थापना करण्यात आली. संस्था समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल, पीडित, रोगग्रस्त व अनाश्रितांच्या उत्थानासाठी कार्यरत आहे. कॅन्सरग्रस्त लोकांना मदत, गरजू विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके, सायकल वितरण, हॉबी क्लासेस आदींसह अनेक उपक्रम राबविले आहेत. याच शृंखलेत आता रक्तदान शिबिराचा महाजागर महाराष्ट्रभर करण्यात येणार आहे. १५ ऑक्टोबरला सांगता होईल. या माध्यमातून १ लाख रक्ताच्या बॉटल रक्तपेढीकडे सोपविण्याचा संकल्प आहे.
कोरोनामुक्त झाल्यावर २८ दिवसांनी रक्तदान करता येते. रक्तदान नेमके कधी करावे, कोणत्या वयोगटातील व्यक्तीने करावे यासह इतर महत्त्वाच्या बाबीवर या मोहिमेदरम्यान जनजागृती करण्यात येणार आहे. या रक्तदान मोहिमेत नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
माहितीपर कार्यक्रमात अन्न व औषध विभागाचे डॉ. पी. एम. नरवाळ यांनी उपक्रमाचे कौतुक केले आणि प्रशासनातर्फे सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यावेळी देवता लाईफ फाऊंडेशनच्या पदाधिकारी नीलिमा बावणे, कस्तुरी बावणे, सारिका पेंडसे, सुधीर बाहेती, राम बोडे, सोनी, विभूती कश्यप, समीर सराफ, अशोक अंबरते, सुशांत दहिवलकर, डॉ. गिऱ्हे, संजय पेंडसे, अस्मिता बावणे, प्रताप हिराणी, विवेक जुगादे, अरुणा पुरोहित उपस्थित होते.