आरएफओ आत्महत्या प्रकरणी डिएफओ शिवकुमारला अटक, निलंबित....
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:08 AM2021-03-27T04:08:05+5:302021-03-27T04:08:05+5:30
आरएफओ दीपाली चव्हाण यांनी ज्या शासकीय निवासस्थानी आत्महत्या केली, तेथून धारणी पोलिसांनी चव्हाण यांनी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे अपर प्रधान ...
आरएफओ दीपाली चव्हाण यांनी ज्या शासकीय निवासस्थानी आत्महत्या केली, तेथून धारणी पोलिसांनी चव्हाण यांनी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम.एस. रेड्डी यांच्या नावे लिहिलेले तीन पानी पत्र जप्त केले. प्रशासकीय कामकाजादरम्यान दिलेला त्रास, पगार बिल रोखणे, सुट्या न देणे, रात्री बेरात्री संकुल, आकोट फाट्यावर बोलावून एकटेपणाचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न, सहकाऱ्यांदेखत होणारी अश्लील शिवीगाळ, विनोद शिवकुमारने गर्भावस्थेत असताना जाणूनबुजून जंगल फिरविल्याने गर्भपात झाल्याचा उल्लेख, त्यामुळे झालेला व होणारा प्रचंड मानसिक त्रास यातून माझ्या आत्महत्येला विनोद शिवकुमार हेच सर्वस्वी जबाबदार आहेत. त्यांच्यावर कारवाई कराल, हीच शेवटची इच्छा. जे माझ्यासोबत झाले, ते यापुढे इतर कुणासोबत होऊ नये, असे लिहित त्याखाली चव्हाण यांनी स्वाक्षरी केली आहे.
शवविच्छेदन अमरावतीला
पोलिसांना घटनेची माहिती मिळताच एसडीपीओ संजय काळे, ठाणेदार विलास कुलकर्णी, सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत गीते, पीएसआय मंगेश भोयर, पीएसआय हर्षल चाफले, मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी घटनास्थळी धाव घेऊन प्राथमिक तपास सुरू केला. त्यांनतर त्यांचा मृतदेह हरिसाल येथून ११ वाजता दरम्यान धारणी उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अमरावती येथे शवविच्छेदनाचा सल्ला दिल्याने त्यांचा मृतदेह तेथेच रुग्णवाहिकेत ठेवण्यात आला. त्यानंतर त्यांचे पती राजेश मोहिते हे पोलिसांत तकार देण्याकरिता पोहचले. त्यांची तक्रार मध्यरात्रीच पीएसआय सुयोग महापुरे यांनी नोंदवून घेतली. त्यांनतर पोलीस बंदोबस्तात मृतदेह अमरावती येथे नेण्यात आला. तेथे त्याचे शुक्रवारी दुपारी शव विच्छेदन करण्यात आले. त्यानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मोरगाव या राजेश मोहिते यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार होणार आहे.
साेशल मीडियावर ‘जस्टीस फाॅर दीपाली चव्हाण’
वनविभाग नव्हे तर, सोशल मीडियावर ‘जस्टिस फॉर दीपाली चव्हाण’ अशी मागणी बुुलंद झाली आहे. विनोद शिवकुमारने केलेल्या घृणास्पद कृत्यावर प्रचंड संताप नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे. सोबतच मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक एस.एम. रेड्डी यांच्या भूमिकेविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे.
आईसह कुटुंबीयांचे रुग्णालयासमाेर धरणे
दरम्यान, शिवकुमारला अटक झाल्यानंतरही कुटुंबीय व विभागातील कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष खदखदत आहे. दीपाली यांच्या आईसह कुटुंबीयांनी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक आणि अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी यांच्यावरही कारवाईची मागणी करीत अमरावती येथील ग्रामीण रुग्णालयासमाेर धरणे आंदाेलन केले.
एपीसीसीएफ रेड्डींवरही कारवाईची मागणी
दुसरीकडे वनविभागाच्या संघटनांमध्येही या घटनेमुळे तीव्र राेष पसरला आहे. फॉरेस्ट रेंजर्स असोसिएशन तसेच महाराष्ट्र स्टेट गॅझेटेड ऑफिसर्स असोसिएशन नागपूरतर्फे अध्यक्ष सुभाष डाेंगरे व महासचिव याेगेश वाघाये, महाराष्ट्र वनरक्षक, वनपाल संघटनेतर्फे इंद्रजित बारस्कर आदी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी शिवकुमारवर कठाेर कारवाई आणि पीसीसीएफ रेड्डी यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी केली आहे. या सर्व संघटनांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. खासदार नवनीत राणा व भाजपचे प्रवीण दरेकर यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले.