नागपुरात अनिर्मित तंबाखू निर्मात्यावर डीजीजीआयची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2020 08:22 PM2020-07-17T20:22:59+5:302020-07-17T20:24:19+5:30
चुना लावून हातावर मळून थेट खाण्यात येणारा तंबाखू अर्थात अनिर्मित तंबाखूच्या एका निर्मात्यावर जीएसटी चोरी प्रकरणात गुप्तचर जीएसटी महासंचालनालयाच्या (डीजीजीआय), नागपूर झोनल युनिटने मोठी कारवाई केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : चुना लावून हातावर मळून थेट खाण्यात येणारा तंबाखू अर्थात अनिर्मित तंबाखूच्या एका निर्मात्यावर जीएसटी चोरी प्रकरणात गुप्तचर जीएसटी महासंचालनालयाच्या (डीजीजीआय), नागपूर झोनल युनिटने मोठी कारवाई केली आहे. ही कारवाई डीजीजीआय नागपूर युनिट आणि नाशिक विभागीय युनिटने संयुक्तरीत्या केली. यात १.७५ कोटींच्या जीएसटी (वस्तू व सेवा कर) चोरीचा खुलासा झाला आहे.
माहितीच्या आधारे डीजीजीआयच्या दहा सदस्यीय चमूने १४ आणि १५ जुलैला जळगाव येथील प्रमुख अनिर्मित तंबाखूच्या निर्मात्याचे मुख्य व्यावसायिक स्थळ आणि दोन युनिटवर छापे टाकले. विचारपूस केल्यानंतर निर्मात्याने सांगितले की, गुजरात येथून तंबाखू मागवितो. तंबाखू एक युनिटमध्ये वाळविल्यानंतर दुसऱ्या युनिटमध्ये पॅकिंग करण्यात येते. याकरिता जीएसटी इनव्हाईस जारी करण्यात येते. परंतु या प्रतिष्ठानांतून जप्त केलेल्या कागदपत्रांची बारकाईने चौकशी केल्यानंतर अनेक बाबींचा खुलासा झाला. हा करदाता जीएसटीविना इनव्हाईस जारी करून आपल्या शाखांच्या माध्यमातून थेट अनिर्मित तंबाखूचा व्यवसाय करून जीएसटीची चोरी करीत असल्याचे स्पष्ट झाले. पण तो कागदपत्रांमध्ये आपल्या मुख्य व्यावसायिक स्थळांमधून युनिटमध्ये तंबाखूचा पुरवठा करीत असल्याचे दर्शवित होता.
प्रारंभिक तपासणी आणि चौकशीत अनिर्मित तंबाखू निर्मात्याने १.७५ कोटी रुपयांची जीएसटी चोरी केल्याचा खुलासा झाला. अशा स्थितीत संबंधित व्यावसायिकाने डीजीजीआय चमूला जागेवरच ५० लाख रुपयांच्या जीएसटीचे भुगतान केले. पुढील काही दिवसात होणाºया चौकशीत ३ ते ४ कोटी रुपयांची जीएसटी चोरीचा खुलासा होण्याची शक्यता चमूने व्यक्त केली.
सर्वाधिक करांमुळे चोरीच्या मार्गाचा अवलंब
तंबाखूवर ९९ टक्के जीएसटी वसूल करण्यात येतो. यामध्ये २८ टक्के जीएसटी आणि ७१ टक्के अन्य संबंधित कर वसूल करण्यात येतो. सर्वाधिक कर वसुलीमुळे तंबाखू निर्मात्याने चोरीचा मार्ग अवलंबला. सिगारेटवर १५० टक्के कर वसूल करण्यात येतो.