डीजींचा नाईट राऊंड

By admin | Published: February 7, 2016 02:54 AM2016-02-07T02:54:42+5:302016-02-07T02:54:42+5:30

धक्कातंत्राचा वापर करून नागरिकांसोबत पोलीस अधिकाऱ्यांनाही अनेकदा स्तंभित करणारे पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी..

Dg's Night Round | डीजींचा नाईट राऊंड

डीजींचा नाईट राऊंड

Next

अनेक ठाण्यांना भेटी : जागते रहो चा संदेश
नरेश डोंगरे नागपूर
धक्कातंत्राचा वापर करून नागरिकांसोबत पोलीस अधिकाऱ्यांनाही अनेकदा स्तंभित करणारे पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी शुक्रवार ते शनिवारच्या रात्री नागपुरात नाईट राऊंड करून पुन्हा एकदा पोलीस खात्याला अचंबित केले. विविध भागात भेटी देऊन उपराजधानीतील ‘नाईट पुलिसिंग तपासतानाच ‘जागते रहो’चा संदेशही दिला.
रात्रीच्या वेळी अचानक कुण्या भागात कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती निर्माण झाल्यास कनिष्ठ अधिकाऱ्यांची कोंडी होऊ नये तसेच पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी रात्रीच्या वेळी प्रामाणिकपणे कर्तव्य बजावावे म्हणून दरदिवशी वरिष्ठ अधिकारी (डीसीपी) रात्रीची गस्त (नाईट राऊंड) करतात. पोलिसांचे मनोबल उंचावण्याचाही नाईट राऊंडमागे उद्देश असतो.
थर्टी फर्स्ट सारख्या दिवशी किंवा आणीबाणीची स्थिती असल्यास सहपोलीस आयुक्त आणि दस्तुरखुद्द पोलीस आयुक्तही एखादवेळी नाईट राऊंड करतात.

पोलीस ठाण्यांना भेटी


नागपूर : थेट पोलीस महासंचालकांनीच दुसऱ्या शहरात (मुंबई वगळता) दौऱ्यावर असताना नाईट राऊंड केल्याचे ऐकिवात नाही. पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी मात्र शुक्रवारी रात्री ११ वाजतापासून तो रात्री २ ते २.३० वाजेपर्यंत नाईट राऊंड करून सीताबर्डी, धंतोली, इमामवाडा आणि लकडगंज पोलीस ठाण्यांना भेटी दिल्या. तेथील रात्रीच्या कामकाजाची पाहणी केली. कर्मचारी, अधिकाऱ्यांची उपस्थिती, वर्तन तपासले.
उपस्थितांशी चर्चा करताना ठाण्यात किती कर्मचारी, अधिकारी कामावर आहेत, त्यातील किती उपस्थित, किती अनुपस्थित आहे, ते तपासले. रात्रीच्या वेळी कुणाची जबाबदारी कोणती, कोण काय करतात अशा प्रकारे कामकाजाची माहिती घेतानाच काही अडचणी येतात काय, त्याबाबतही विचारणा केली.
नागपुरात आयुक्त म्हणून कार्यरत असताना दीक्षित रात्री बेरात्री कोणत्याही घटनास्थळी, पोलीस ठाण्यात भेट द्यायचे. अनेकदा अपघात किंवा अन्य कोणत्या कारणामुळे तणाव निर्माण झाल्यास पोलीस फोर्स पोहचण्यापूर्वीच दीक्षित घटनास्थळी पोहचल्याचे नागपूरकरांच्या आठवणीत आहे. तेथील परिस्थिती चिघळू नये, नागरिकांना दिलासा मिळावा आणि पोलीस कर्मचारी, अधिकाऱ्यांचे मनोबल उंचावे, हा उद्देश त्यामागे असायचा.
येथून बदली झाल्यानंतर गृहविभागाचे सचिव आणि नंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस महासंचालक म्हणून त्यांनी धडाकेबाज सेवा दिली. स्वच्छ तसेच ‘रिझल्ट ओरिएंटेड’ प्रतिमा आणि सेवाज्येष्ठतेमुळे राज्य पोलीस दलाच्या प्रमुखाची (डीजी) जबाबदारी स्वीकारल्यानंतरही दीक्षित यांनी आपला साधेपणा जपला आहे. मात्र, वेळोवेळी धक्कातंत्राचा वापर करून ‘सूचक संदेश’ देण्याची त्यांची शैली कायम आहे.
पोलीस महासंचालक झाल्यानंतर मुंबई ते नागपूर असा चक्क रेल्वेने प्रवास करून त्यांनी पहिला धक्का देत साऱ्यांनाच अचंबित केले होते.

होशियार... खबरदार...!
विदर्भातील कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी दीक्षित शुक्रवारी (५ जानेवारी) रात्री नागपुरात पोहचले. रात्रीचे जेवण आटोपताच ते उपराजधानीतील रात्रीच्या स्थितीचा ‘आखों देखा हाल’ अनुभवण्यासाठी निघाले. रात्री ११ ते ११.३० ला सीताबर्डी, तेथून धंतोली, इमामवाडा आणि नंतर लकडगंज ठाण्यात ते पोहचले. त्यानंतर पहाटे ते जिमखान्यात पोहचले. दस्तुरखुद्द डीजीच रात्रभर ठिकठिकाणच्या पोलीस ठाण्यांतर्गत भेट देत असल्याचा ‘एअर मेसेज’ मिळत असल्याने अख्खे नागपूर पोलीस दल ‘होशियार... खबरदार...’ अशा स्थितीत होते. शुक्रवारी पोलीस उपायुक्त ईशू सिंधू यांचा नाईट राऊंड होता. त्यामुळे ते आणि परिमंडळ तीनचे उपायुक्त अभिनाशकुमार हे सुद्धा रात्री २ ते २.३० वाजेपर्यंत सीताबर्डी पोलीस ठाण्यात होते.

Web Title: Dg's Night Round

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.