दीक्षाभूमीवरील धम्मचक्र प्रवर्तन दिन यंदा साधेपणानेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2020 08:08 PM2020-10-13T20:08:02+5:302020-10-13T20:09:45+5:30
Dhammachakra pravartan Din, Dikshabhoomiकोरोनाच्या पार्श्वभूमीवर दीक्षाभूमीवर होणारा ६४ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन यंदा साधेपणानेच साजरा करण्यात येणार आहे. यावेळी मुख्य सोहळ्यासह सर्व प्रकारचे सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दीक्षाभूमीवर होणारा ६४ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन यंदा साधेपणानेच साजरा करण्यात येणार आहे. यावेळी मुख्य सोहळ्यासह सर्व प्रकारचे सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे. १४ ऑक्टोबर व २५ ऑक्टोबर या दोन्ही दिवशी दीक्षाभूमीचे सर्व गेट बंद राहतील. तेव्हा अनुयायांनी दीक्षाभूमीवर गर्दी करू नये, अशी माहिती डाॅ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे सचिव डाॅ. सुधीर फुलझेले यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत दिली.
१४ ऑक्टोबर १९५६ अशोक विजयादशमी दिनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पवित्र दीक्षाभूमीवर सकाळी ९ वाजता पूज्य महाास्थवीर चंद्रमणी यांच्याकडून त्रिशरण व पंचशील ग्रहण करून धम्मदीक्षा घेतली. त्या प्रसंगाची स्मृती म्हणून या वर्षी देखील येत्या २५ ऑक्टोबर रोजी अशोक विजयादशमीच्या दिवशी सकाळी ९ वाजता दीक्षाभूमीवर भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई , आणि स्मारक समितीचे सदस्य यांच्या उपस्थितीत बुद्धवंदना घेण्यात येईल. त्यावेळी नागिरकांनी आपापल्या घरीच सकाळी ९ वाजता बुद्धवंदना घ्यावी. तत्पूर्वी सकाळी ८.३० वााजता डाॅ. बाबासाहेब आंबेडकर व भगवाान बुद्धांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून भीम वंदना व बुद्ध वंदना होईल. ९.३० वाजता भिक्षुसंघाद्वारे बुद्ध गाथांचे पठण केले जाईल. यापूर्वी २४ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता पंचशील ध्वजारोहण करण्यात येईल. यावेळी समता सैनिक दलातर्फे मानवंदना देण्यात येईल. या कार्यक्रमाचे लाईव्ह दीक्षाभूमी नागपूर यु-ट्यूब, आवाज इंडिया टीव्ही व युसीएन बुद्धा यावर दाखिवण्यात येईल. पत्रपरिषदेला स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई, सदस्य विलास गजघाटे व एन.आर. सुटे उपस्थित होते.
कोरोना योद्धांना श्रद्धांजली, स्तुपावर रोषणाई नाही
कोरोनाच्या लढ्यात अनेक नागरिक, डाॅक्टर, आरोग्य अधिकारी, कर्मचारी, पोलीस, सफाई कर्मचाऱ्यांना आपला जीव गमवावा लागला. या कोरोना योद्धाना श्रद्धांजली प्रित्यर्थ व त्यांच्या कुटुंबाांच्या दु:खात सामील होण्याच्या भावनेतून दीक्षाभूमीच्या स्तुपावर यावर्षी रोषणाई न करण्याचा निर्णय सुद्धा स्मारक समितीने घेतला असल्याचे डाॅ. फुलझेले यांनी सांगितले.