दीक्षाभूमीवरील धम्मचक्र प्रवर्तन दिन महोत्सव आजपासून; महिला धम्म परिषदेने सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2022 08:00 AM2022-10-02T08:00:00+5:302022-10-02T08:00:06+5:30
Nagpur News ६६व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त यंदाही दीक्षाभूमीवर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. २ ऑक्टोबरपासून महोत्सवाला सुरुवात होत आहे.
नागपूर : ६६व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त यंदाही दीक्षाभूमीवर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. २ ऑक्टोबरपासून महोत्सवाला सुरुवात होत आहे. मुख्य कार्यक्रम हा ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता होईल. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रमुख अतिथी राहतील. दीक्षाभूमी स्मारक समितीचे सचिव डॉ. सुधीर फुलझेले यांनी शनिवारी आयोजित पत्रपरिषदेत याबाबत सविस्तर माहिती दिली.
२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता महिला धम्म मेळाव्याने या महोत्सवाला सुरुवात होईल. कमलताई गवई या अध्यक्षस्थानी राहतील. भिक्खूनी विजया मैत्रेय, सुषमा पाझारे, प्राचार्या भूवनेश्वरी मेहरे, प्रा. सरोज आगलावे, प्रा. प्रज्ञा बागडे, छाया खोब्रागडे प्रमुख अतिथी राहतील. ४ ऑक्टोबर रोजी सकाळी सकाळी ९ वाजता पंचशील झेंड्याचे ध्वजारोहण होईल. सायंकाळी ६ वाजता धम्मपरिषद होईल. यात थायलंड, जपान, मलेशियासह विविध देशातील बौद्ध भंते सहभागी होतील. ५ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजता बुद्ध भीम गीतांचा धम्मपहाट कार्यक्रम होईल. सकाळी ९ वाजता भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई हे सामूहिक बुद्धवंदना घेतील. याच वेळी सर्व विहारांनी सुद्धा आपापल्या विहारांमध्ये बुद्ध वंदना घ्यावी, असे आवाहनही स्मारक समितीने केले आहे सायंकाळी मुख्य कार्यक्रम होईल.
हजारो लोक घेणार धम्मदीक्षा
दरवर्षीप्रमाणे यंदाही हजारो लोक धम्मदीक्षा घेतील. ३ ऑक्टोबर पासून धम्मदीक्षेचा कार्यक्रम सुरू होईल. भंते आर्य नागार्जुन सुरेई ससाई व त्यांचा भिक्खू संघ धम्मदीक्षा देतील.
- दीक्षाभूमीवर ५६ फुटांची बुद्धमूर्ती
थायलंडतर्फे दीक्षाभूमीवर ५६ फुटांची बुद्धमूर्ती बसवण्यात येणार आहे. त्याचे कार्य सुरू आहे. आणखी २ ते अडीज वर्ष लागतील. नवीन आराखड्यानुसार नव्या जागेत ही मूर्ती बसवण्यात येईल. परंतु या मूर्तीच्या भूमिपूजनाचे काम ४ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० वाजता होईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली.