नागपुरात उभारणार धम्म प्रशिक्षण केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 09:55 PM2018-09-22T21:55:34+5:302018-09-22T21:56:30+5:30
नागपुरात बौद्ध धम्म प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार असून यात बौद्ध भिक्खूसंह उपासक व उपासिकांनाही प्रशिक्षणाची व्यवस्था असेल, अशी माहिती थायलंड येथील वर्ल्ड अलायन्स आॅफ बुद्धिस्टचे अध्यक्ष भदंत डॉ. पोनचाई पिनियापाँग यांनी शनिवारी येथे सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपुरात बौद्ध धम्म प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार असून यात बौद्ध भिक्खूसंह उपासक व उपासिकांनाही प्रशिक्षणाची व्यवस्था असेल, अशी माहिती थायलंड येथील वर्ल्ड अलायन्स आॅफ बुद्धिस्टचे अध्यक्ष भदंत डॉ. पोनचाई पिनियापाँग यांनी शनिवारी येथे सांगितले.
आंतरराष्ट्रीय शांती दिवसानिमित्त वर्ल्ड अलायन्स आॅफ बुद्धिस्ट थायलंड, आणि निर्वाणा पीस फाऊंडेशन बांग्लादेश यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी दीक्षाभूमी येथे आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट युवा परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त ते नागपुरात आले असता पत्रकारांशी बोलत होते. यावेळी निर्वाणा पीस फाऊंडेशनचे अध्यक्ष साबुज बरुआ, सचिव मिथिला चौधरी, भदंत खेमचारा, दी बुद्धिस्ट सोसायटी आॅफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रबोधी पटील, अहिल्याबाई होळकर बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे नितीन गजभिये, प्रकाश कुंभे, प्रेम गजभिये उपस्थित होते.
भदंत पिनियापाँग यांनी सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ऐतिहासिक धम्म क्रांती करून या देशात पुन्हा बौद्ध धम्माचे पुनरुज्जीवन केले. त्यांच्या या ऐतिहासिक कार्याबद्दल व दीक्षाभूमीबद्दल आपल्याला विशेष प्रेम व आकर्षण आहे. भारतात अनेक बौद्ध बांधव समाजात चांगले काम करीत आहेत. त्यांनी बुद्धाच्या शांतीच्या मार्गाने चालत असेच कार्य करीत राहावे, यासाठी बौद्ध समाजातील अशा युवकांना व समाजबांधवांना सन्मानित करण्याच्या उद्देशाने दीक्षाभूमीवर आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट युवा परिषद आयोजित करण्यात आली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ही परिषद रविवारी सकाळी १० वाजता सुरु होईल.