दीक्षाभूमीवरील धम्मदीक्षेच्या सोहळ्याला आजपासून सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2023 10:41 AM2023-10-21T10:41:58+5:302023-10-21T10:42:10+5:30
आज महिला धम्म परिषद : मुख्य समारंभ २४ रोजी
नागपूर : ६७ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने दीक्षाभूमीवर आयोजित धम्मदीक्षा सोहळ्याला शनिवारपासून सुरुवात होत आहे. धम्मदीक्षा सोहळ्याचा मुख्य समारंभ हा मंगळवार, २४ ऑक्टोबर रोजी होईल.
दीक्षाभूमी महिला धम्म संयोजन समितीच्या वतीने २१ ऑक्टोबरला एकदिवसीय महिला धम्म परिषद आयोजित करण्यात आली आहे. माजी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते शनिवारी सकाळी १० वाजता या संमेलनाचे उद्घाटन होईल. अध्यक्षस्थानी स्मारक समितीच्या सदस्य डॉ. कमलताई गवई असतील. विशेष पाहुणे म्हणून भिक्खुनी शाक्य धम्मदिना, अपर आयुक्त डॉ. माधवी खोडे, प्राचार्य डॉ. भुवनेश्वरी मेहेरे, विचारवंत कीर्ती अर्जुन गवई आणि रेखा खोब्रागडे, स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागाजुर्न सुरेई ससाई प्रामुख्याने उपस्थित राहतील.
दुपारी प्रथम सत्र डॉ. प्रज्ञा बागडे यांच्या अध्यक्षतेखाली सुरू होईल. ‘प्रॉब्लेम ऑफ रूपी या ग्रंथाचे समकालीन संदर्भ व वास्तव’ या विषयावर डॉ. वैशाली बांबोळे भाष्य करतील. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीची फलश्रुती’ या विषयावर जसविंदर कौर मत मांडतील. ‘भारतातील स्त्रियांच्या अत्याचाराचा कळस’ या विषयावर छाया खोब्रागडे विचार मांडतील, तर ‘आंदोलनात महिलांची भूमिका’ यावर उज्ज्वला गणवीर भूमिका मांडतील.
उद्घाटनानंतर संथागार फाउंडेशनच्या वतीने एस. एस. जांभूळकर लिखित आणि डॉ. वीणा राऊत दिग्दर्शित ‘संविधान जागर’ आणि पल्लवी जीवनतारे ‘चळवळ’ सादर करतील. वीरेंद्र गणवीर लिखित ‘गटार’ ही एकांकिका आणि वंदना जीवने यांचा एकपात्री नाट्यप्रयोग यावेळी सादर करण्यात येणार आहे. रात्री ९ पर्यंत निमंत्रितांचे कविसंमेलन ज्येष्ठ कवी इ. मो. नारनवरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले आहे. प्रमुख पाहुणे सुनीता झाडे असतील.