पाच जणींच्या मृत्युमुळे धामना गाव शोकाकुल; स्फोटाचे हादरे, घराघरात, मनामनात
By नरेश डोंगरे | Published: June 13, 2024 10:51 PM2024-06-13T22:51:07+5:302024-06-13T22:51:20+5:30
महिला-मुलींना आक्रोश अनावर, शोकसंतप्त गावकऱ्यांची अवस्था शब्दातीत
नागपूर : घरातील चुल पेटविण्यासाठी स्फोटकांच्या कारखान्यात काम करणाऱ्या गावातील पाच तरुणींचा गुरुवारी दुपारी भीषण स्फोटात करुण अंत झाला. त्यामुळे उभे धामना गावच हबकले आहे. या स्फोटाचे हादरे धामना गावातील घराघराला आणि मनामनाला बसले असून गावातील महिला-पुरुष, आबालवृद्ध सारेच सुन्न पडल्यासारखे झाले आहेत.
नागपूर-अमरावती मार्गावर हे चार ते पाच हजार लोकवस्तीचे धामना हे ईवलेसे गाव आहे. गावातील बहुतांश मंडळी शेतकरी, शेतमजूर आहेत. शिकून सवरूनही रोजगार मिळत नसल्याने आणि शहरात येऊन कामधंदा करणे शक्य नसल्याने गावातील सुमारे ७० ते ८० जण चामुंडी एक्सप्लोसिव्ह प्रा. लि. कंपनीत कामाला जातात. त्यात तरुण-तरुणींचीही संख्या मोठी आहे. सकाळी ७ ते ३ आणि दुपारी ४ ते १२ अशा दोन शिफ्टमध्ये कंपनीत स्फोटक हाताळणीच्या वेगवेगळ्या विभागात काम चालते.
नेहमीप्रमाणे गावातील प्रांजली किसन मोदरे (२२), वैशाली आनंदराव क्षीरसागर (२०),
प्राची श्रीकांत फलके (१९), शितल आशिष चटप (वय २८) आणि मोनाली शंकरराव अलोने (२५) या पाच जणी अन्य महिलांसह भल्या सकाळीच गुुरुवारी घरून कंपनीत कामासाठी निघाल्या. दुपारी १२ ते १ च्या अवधीत अनेक जण जेवणासाठी सुटी (लंच ब्रेक) घेतात. मात्र, प्रांजली, वैशाली, प्राची, शितल आणि मोनाली यांनी काम हातावेगळे करून जेवण करण्याचा विचार केला असावा, तोच त्यांच्यासाठी जिवघेणा ठरला. भयानक स्फोट झाला अन् त्या पाचही जणींचा मृत्यू झाला.
या पाचही जणींचे घर गावातील वेगवेगळ्या भागात आहे. त्यांचे मृत्यू झाल्याचे वृत्त गावात धडकले अन् त्यांच्या घरात एकच आक्रोश निर्माण झाला. नातेवाईकांसोबतच घराघरात बायबापड्यांचे हुंदके ऐकू येऊ लागले. मृत तरुणीं गावातील कुणाच्या नातेवाईक तर कुणाच्या मैत्रीणी होत्या. संपूर्ण गावच एकमेकांना ओळखत असल्याने एकाच दिवशी गावातील तरुणींच्या मृत्यूने गावावर शोककळा पसरवली. कामधंदा सोडून गावकरी तरुण मंडळी कारखाना परिसराकडे रोष व्यक्त करण्यासाठी धावले. तर, ईकडे आबालवृद्ध, महिला मृतक तरुणींच्या घरासमोर घोळका करून शोक व्यक्त करू लागल्या. त्या सर्वांची स्थिती शब्दातील होती अन् गावात पसरलेली शोककळा काळजात धस्स करणारी होती.