धान चाेरटे अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:10 AM2021-02-10T04:10:01+5:302021-02-10T04:10:01+5:30
रेवराल : अराेली (ता. माेदा) पाेलिसांनी रामटेक शहरातील तहसील कार्यालय परिसरात केलेल्या कारवाईमध्ये धानाची चाेरी करणाऱ्या चाैघांना अटक केली. ...
रेवराल : अराेली (ता. माेदा) पाेलिसांनी रामटेक शहरातील तहसील कार्यालय परिसरात केलेल्या कारवाईमध्ये धानाची चाेरी करणाऱ्या चाैघांना अटक केली. त्यांच्याकडून १ लाख ४० हजार रुपये किमतीचे ६६ पाेते धान जप्त केल्याची माहिती ठाणेदार विवेक साेनवणे यांनी दिली. चाेरट्यांनी बेरडेपार, माेरगाव व इतर शिवारातून धानाची चाेरी केल्याचे कबूल केले, असेही पाेलिसांनी सांगितले.
अमोल धनराज पिसे (२४), आकाश मोरेश्वर हटवार (२१) दाेघेही रा. चोखाळा, ता. रामटेक, प्रफुल्ल मोरेश्वर चाफले (२४, रा. नंदापुरी, ता. माैदा) व इंद्रपाल शिवप्रसाद सिंग (२४, रा. कन्हान, ता. पारशिवनी) अशी अटक करण्यात आलेल्या आराेपींची नावे आहेत. माैदा तालुक्यातील काही शिवारातून धान चाेरीला जात असल्याने शेतकरी त्रस्त झाले हाेते. त्यातच या चाेरीत अमाेल पिसे व आकाश हटवार यांचा सहभाग असल्याची तसेच त्यांनी बाजारात धानाची विक्री केल्याची माहिती पाेलिसांना मिळाली हाेती. ते रामटेक शहरातील तहसील कार्यालय परिसरात असल्याचे कळताच पाेलिसांनी सापळा रचून अमाेल व आकाशसह प्रफुल्ल व इंद्रपालला ताब्यात घेतले.
चाैकशीदरम्यान या चाैघांनीही बेरडेपार शिवारातून ७० हजार रुपयांचे ३५ पाेते धान, मोरगाव शिवारातून ३० हजार रुपये किमतीचे ११ पाेते धानाची चाेरी केल्याचे तसेच रेवराल, खंडाळा शिवारातूनही धान लंपास केल्याचे पाेलिसांनी सांगितले. धानाच्या पाेत्यांच्या वाहतुकीसाठी त्यांनी कधी माेटारसायकल तर कधी चारचाकी वाहनाचा वापर केला हाेता. त्यामुळे पाेलिसांनी चाैघांनाही अटक केली आणि त्यांच्याकडून १ लाख ४० हजार रुपये किमतीचे ६६ पाेते धान जप्त केले. त्यांनी धानाचे पाेते अमाेल पिसे याच्या घरी लपवून ठेवले हाेते, अशी माहिती ठाणेदार विवेक साेनवणे यांनी दिली. याप्रकरणी अराेली पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे. ही कारवाई पाेलीस उपनिरीक्षक ऋषिकेश चाबुकस्वार, उमेश इंगळे, भगवान चांदेकर, प्रवीण सलामी, श्रीकांत दोरकर यांच्या पथकाने केली.