दिवाळीत आॅनलाईन खरेदीची धूम
By admin | Published: October 26, 2014 12:19 AM2014-10-26T00:19:27+5:302014-10-26T00:19:27+5:30
आॅनलाईन शॉपिंगवर विविध सवलतींची आतषबाजी सुरू असल्याने यंदा दिवाळीत याच खरेदीला ग्राहकांनी जास्त पसंती दिली. त्यामुळे यंदाच्या दिवाळीत आॅनलाईन खरेदीत ३५० टक्क्यांनी वाढ
३५० टक्क्यांनी वाढ : मोबाईलचा टक्का वाढला
नागपूर : आॅनलाईन शॉपिंगवर विविध सवलतींची आतषबाजी सुरू असल्याने यंदा दिवाळीत याच खरेदीला ग्राहकांनी जास्त पसंती दिली. त्यामुळे यंदाच्या दिवाळीत आॅनलाईन खरेदीत ३५० टक्क्यांनी वाढ झाल्याचा देशातील विविध व्यावसायिक संघटनांचा अंदाज आहे.
दिवाळीत आॅनलाईन कंपन्यांनी विविध उत्पादनांच्या विक्रीत इतिहास रचला. आॅनलाईन विक्री संकेतस्थळांकडून ग्राहकांसाठी विविध योजना जाहीर केल्या होत्या. त्यामुळेच खरेदीला पसंती मिळाली. संकेतस्थळांकडून केल्या जाणाऱ्या खरेदीमध्ये प्रचंड वाढ झाल्याचे मॉल संचालन करणाऱ्यांचे मत आहे. एका सर्वेक्षणाच्या अहवालानुसार, आॅनलाईन खरेदीच्या वाढणाऱ्या प्रमाणामुळे मॉलमध्ये जाऊन खरेदी करणाऱ्यांच्या संख्येत ५० ते ५५ टक्क्यांची घट झाली आहे. देशात दिवाळीत १८ ते २० हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेची खरेदी आॅनलाईन संकेतस्थळांमार्फत झाली. आगामी तीन ते चार वर्षांत ही उलाढाल एक लाख कोटी रुपयांचा पल्ला गाठू शकेल, असा अंदाज आहे. या क्षेत्रातील तज्ज्ञांनुसार, ई-कॉमर्सच्या माध्यमातून खरेदी केल्यास लोकांना बिलाचे पैसे देण्यासाठी अनेक मार्ग उपलब्ध असतात.
घरच्या घरी सुलभ खरेदी शक्य
सणासुदीच्या हंगामात आॅनलाईन खरेदीमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत यंदा पाच पट जास्त वाढ पाहायला मिळाली. अनेक प्रसिद्ध कंपन्यांचे कपडे, शृंगाराचे सामान, दागिने, भेटवस्तू, पादत्राणे अशा अनेक वस्तू आॅनलाईन विक्री संकेतस्थळांवरून खरेदी केल्या गेल्या. खरेदी केलेल्या वस्तू दोन ते तीन दिवसांतच ग्राहकांना घरपोच मिळत असल्याने ग्राहक आॅनलाईन खरेदीला पसंती देत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. मोबाईल विक्रीत १०० टक्क्यांची वाढ झाल्याचे दिसून आले आहे. भरभरून मिळत असलेल्या सवलतींबरोबरच इंधनांच्या वाढलेल्या किमती आणि खरेदीसाठी असलेल्या असंख्य पर्यायांंमुळे आॅनलाईन खरेदीचा कल वाढत आहे. त्यातूनही मोठ्या महानगरांमध्ये दुकानात जाऊन खरेदी करण्यामध्ये होणारी गैरसोय तसेच मुख्यत्वे सुरक्षेच्या कारणास्तव बहुतांश लोकांनी आॅनलाईन खरेदीलाच पसंती दिल्याचे दिसून आले आहे. भेटवस्तू, इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स, कपड्यांच्या अॅक्सेसरीज, तयार कपडे, गृहोपयोगी वस्तू, संगणक, खेळणी, दागिने, सौंदर्य उत्पादने, आरोग्य उत्पादने आदींची मोठ्या प्रमाणात विक्री झाली. आॅनलाईन खरेदीचे फायदे असून घरपोच सेवेमुळे वेळेची बचत, २४ तासांत कधीही खरेदी शक्य, गर्दीत न जाता घरच्या घरी सुलभ खरेदी, उत्पादनांची तुलना करणे शक्य आहे. मोबाईलच्या उलाढालीत प्रचंड वाढ
यंदाच्या दिवाळीत चायनामेड हॅण्डसेटकडे पाठ फिरवित नागरिकांनी अद्ययावत मल्टिमीडिया सॉफ्टवेअर असलेले मोबाईल मोठ्या प्रमाणात खरेदी केली. नागपुरात दसरा ते दिवाळीदरम्यान ५० कोटींच्या मोबाईलची विक्री झाल्याचे दुकानदारांनी सांगितले. दिवाळीच्या मुहूर्तावर सोने-चांदी आणि वाहन किंवा घरगुती वस्तू खरेदीकडे लोकांचा कल अधिक असतो; परंतु यंदा या वस्तूंबरोबरच मोबाईल खरेदीकडेही लोकांचा अधिक कल राहिला. मल्टिमीडिया आणि टचस्क्रिनचा बोलबाला असल्याने सॅमसंग, मायक्रोसॉफ्ट, एलजी, झोलो, कार्बन, स्पाय या कंपन्यांच्या हॅण्डसेटलाही चांगली मागणी होती. अद्ययावत सॉफ्टवेअर असलेले हॅण्डसेट घेण्याकडे ग्राहकांचा कल होता. मोबाईल बाजारात मल्टिमीडिया साफ्टवेअरची माहिती घेऊन अधिक प्रमाणात विक्री झाली. टचस्क्रिनच्या हॅण्डसेटमध्ये युवकांना थ्रिजी आणि मोबाईल गेमसह वायफाय आणि इतर सुविधा मिळत असल्याने युवकांचा या मोबाईलकडे कल होता. लॅपटॉपनंतर आता टॅब्सची मागणी वाढली आहे. टॅब्स नेण्यासाठी अधिक सोयीस्कर असल्यामुळे या टॅब्सकडे युवकांचाही कल वाढत असल्याची माहिती दिवाळी खरेदीतून समोर आली आहे.(प्रतिनिधी)