“PM किसान, नमो किसान महासन्मान योजनेतून एकही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही”: धनंजय मुंडे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2023 04:14 PM2023-12-14T16:14:39+5:302023-12-14T16:15:09+5:30
Winter Session Maharashtra 2023: काही अटींची पूर्तता न होऊ शकल्याने १२ ते १३ लाख शेतकरी लाभापासून वंचित राहिले होते.
Winter Session Maharashtra 2023: केंद्र सरकारच्या पीएम किसान व राज्य सरकारच्या नमो किसान महासन्मान योजनेतुन राज्यातील एकही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही, यादृष्टीने कृषी विभाग कृतिशील असल्याची माहिती आज कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी विधानसभेत दिली.
या विषयावर आ.नानभाऊ पटोले, आ.बाळासाहेब थोरात आदी सदस्यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यावर, उत्तर देताना धनंजय मुंडे म्हणाले की, पीएम किसान योजनेसाठी राज्यातून सुमारे ९६ लाख शेतकरी पात्र ठरले होते. राज्य सरकारने नमो किसान महासन्मान योजना घोषित केल्यानंतर केंद्राच्या नियमानुसारच या योजनेची कार्यपद्धती निश्चित करण्यात आली होती. मात्र ई केवायसी पूर्ण नसणे, बँक खाते आधार शी संलग्न करणे, अशा काही अटींची पूर्तता न होऊ शकल्याने यांपैकी १२ ते १३ लाख शेतकरी लाभापासून वंचित राहिले होते.
६ लाख शेतकऱ्यांच्या वरील अटींची पूर्तता
पीएम किसान योजनेच्या चौदाव्या हफत्याच्या वितरणानंतर ही बाब लक्षात आल्याने, कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून कृषी, महसूल व भूमिअभिलेख आदी विभागांच्या समन्वयातून एक विशेष मोहीम राबवत आतापर्यंत सुमारे ६ लाख शेतकऱ्यांच्या वरील अटींची पूर्तता करण्यात अली आहे.
दरम्यान, जे शेतकरी अल्प भूधारक किंवा अन्य कारणांनी लाभार्थी ठरत नाहीत, त्यांचे नाव योजनेतून कमी करण्याची देखील कार्यवाही केली जात आहे. मात्र या कार्यवाहीचा परिणाम एकाही पात्र लाभार्थ्यावर होऊ देणार नाही, असे आश्वासन धनंजय मुंडे यांनी उपस्थित प्रश्नाच्या निमित्ताने दिली.