नागपुरात धनत्रयोदशी १०० कोटींची 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2019 11:05 PM2019-10-25T23:05:22+5:302019-10-25T23:06:48+5:30

धनत्रयोदशीचा शुभमुहूर्त साधून सराफा बाजारात सोने खरेदीसाठी ग्राहकांनी मोठी गर्दी केली होती. सराफा बाजारात १०० कोटींची उलाढाल झाल्याची माहिती सराफांनी दिली.

Dhanatrayodashi in Nagpur for Rs 100 crores | नागपुरात धनत्रयोदशी १०० कोटींची 

नागपुरात धनत्रयोदशी १०० कोटींची 

Next
ठळक मुद्देसराफांकडे सोने खरेदीसाठी गर्दी : ग्राहकांचा दागिन्यांच्या बुकिंगवर भर

लोकमत  न्यूज  नेटवर्क 
नागपूर : देशभरात दिवाळीच्या उत्सवाची लगबग सुरू आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या धनत्रयोदशीला घरातील पारंपरिक दागिन्यांची पूजा करण्याची प्रथा आहे. त्यासोबतच संचित धनात वृद्धी व्हावी, यासाठी बाजारातून सोने खरेदी करण्याकडे लोकांचा कल असतो. त्यामुळे धनत्रयोदशीचा शुभमुहूर्त साधून सराफा बाजारात सोने खरेदीसाठी ग्राहकांनी मोठी गर्दी केली होती. सराफा बाजारात १०० कोटींची उलाढाल झाल्याची माहिती सराफांनी दिली. शुक्रवारी जीएसटी वगळता १० ग्रॅम सोने ३८,८०० आणि चांदीचे भाव ४६,५०० रुपयांवर होते. गुरुवारच्या तुलनेत सोने ४०० रुपये आणि चांदीचे भाव एक हजार रुपयांनी वाढले.
दिवाळीच्या उत्साहावर कुठेही विरजण पडल्याचे बाजारपेठेत फेरफटका मारले असता जाणवले नाही. दिवाळीच्या सणांमध्ये सोन्या-चांदीची खरेदी करण्यासाठी अनेक जण उत्सुक असतात. धनत्रयोदशी आणि दिवाळी पाडव्याच्या दिवशी सोने-चांदीची खरेदी करणे शुभ मानले जाते. सध्या सोन्याचे भाव वाढण्याची शक्यता लक्षात घेता अनेकांनी आधीच बुकिंग करून ठेवले आहे. नागपुरात जवळपास १२ मोठ्या शोरूम आणि तीन हजारांपेक्षा जास्त सराफांची दुकाने आहे. या सर्वच दुकानात ग्राहकांची गर्दी होती.
लोक धनत्रयोदशीला एकतरी ग्रॅम सोन्याची खरेदी करतात. त्यामुळे धनत्रयोदशीला सोने-चांदीची उलाढाल कोट्यवधींची असते. सराफा बाजारपेठेतील व्यावसायिकांच्या मते, गेल्या पाच वर्षांतील ट्रेण्ड बघितला तर दिवाळीनंतर म्हणजे तुळशीपूजनानंतर लग्नसराई सुरू होत असल्याने सोन्याचे दर कमी होत नाही, तर वाढतात. त्यामुळे बरेचदा आधीच खरेदी करून ठेवण्यावर भर असतो. यंदाही असेच चित्र असल्याने नागरिकांची सोने खरेदीची लगबग सुरू झाली आहे. मुहूर्ताला सोनेखरेदी बरोबरच नव्या वस्तूंच्या खरेदीचे प्रमाण अजूनही कायम आहे. त्यामुळे बरेचदा धनत्रयोदशी किवा ऐन लक्ष्मीपूजनाच्या दिवशी बाजारात होणारी गर्दी बघता आधीच बुकिंग करून ठेवण्यावर ग्राहकांचा भर असतो.
धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या मुहूर्तासाठी सराफांनी पारंपारिक आणि आधुनिक डिझाईनचे दागिने प्रदर्शित केले आहेत. वजनात हलके आणि जड दागिने आहेत. ग्राहकांना एक ग्रॅमपासून तोळ्यांपर्यंत खरेदीची संधी आहे. यावर्षी धनत्रयोदशीला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याचे सराफांनी सांगितले.

अपेक्षेपेक्षा जास्त गर्दी
यावर्षी धनत्रयोदशीला अपेक्षेपेक्षा जास्त गर्दी होती. तसे पाहता शनिवार आणि रविवार सुटी असल्यामुळे धनत्रयोदशी तीन दिवस असल्याचे म्हणता येईल. सर्वच शोरुममध्ये खरेदीसाठी गर्दी होती. ग्राहकांनी सोने खरेदीसह दागिन्यांचे बुकिंग केले.
राजेश रोकडे, संचालक, रोकडे ज्वेलर्स.

Web Title: Dhanatrayodashi in Nagpur for Rs 100 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.