धंतोली, मंगळवारी, हनुमाननगर झोनमध्ये डेल्टा प्लसचे रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:12 AM2021-08-25T04:12:01+5:302021-08-25T04:12:01+5:30
नागपूर : ‘डेल्टा प्लस व्हेरियंट’हा वेगाने पसरत असल्याने केंद्र सरकारने 'विषाणूचा चिंताजनक प्रकार' म्हणून घोषित केला आहे. या ...
नागपूर : ‘डेल्टा प्लस व्हेरियंट’हा वेगाने पसरत असल्याने केंद्र सरकारने 'विषाणूचा चिंताजनक प्रकार' म्हणून घोषित केला आहे. या विषाणूचे सोमवारी विदर्भात २१ रुग्ण आढळून आले. यातील ५ नागपूर शहरातील आहेत. हे रुग्ण धंतोली, मंगळवारी व हनुमानगर झोनमधील असून आरोग्य विभागाकडून खबरदारीच्या उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत.
जास्त संक्रमक आणि आजाराला घातक रूप देणारा ‘डेल्टा प्लस व्हेरिएन्ट’ची ओळख असली तरी प्रत्यक्षात अद्यापही असा कुठलाही धोका झाल्याचे दिसून आलेले नाही. सोमवारी या ‘व्हेरिएन्ट’चे नागपूर जिल्ह्यात ५, गडचिरोली व अमरावती जिल्ह्यातील प्रत्येकी ६, यवतमाळ जिल्ह्यातील ३ तर भंडारा जिल्ह्यातील १ रुग्ण आहे. राज्यात डेल्टा प्लसच्या रुग्णांची संख्या १०३ झाली आहे.
-सर्व रुग्ण कोरोनातून मुक्त
मनपाच्या आरोग्य विभागाचे अधिकारी डॉ. संजय चिलकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले, ‘डेल्टा प्लस’च्या ५ रुग्णांमध्ये धंतोली झोनअंतर्गत वसाहतीमधील २, मंगळवारी व हनुमाननगर झोनअंतर्गत वसाहतीमधील प्रत्येकी १ तर जिल्हाबाहेरील म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यातील १ रुग्ण आहे. या सर्व रुग्णांचे नमुने जुलै महिन्यात पाठविले होते. सध्या हे सर्व रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. त्यांच्यापासून इतरांना आजारही पसरला नसल्याची प्राथमिक माहिती आहे. परंतु खबरदारी म्हणून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा पुन्हा एकदा तपासण्या केल्या जाणार आहेत.
-घाबरण्याचे कारण नाही
संसर्गजन्य रोग तज्ज्ञ डॉ. नितीन शिंदे यांनी सांगितले, दुसऱ्या लाटेसाठी कारणीभूत ठरलेल्या कोरोनाचा ‘डेल्टा’ या विषाणूच्या प्रकाराच्या तुलनेत ‘डेल्टा प्लस’ हा कमी धोकादायक आहे. तसा ‘डाटा’ ‘आयसीएमआर’कडे उपलब्ध आहे. आतापर्यंत जे रुग्ण ‘डेल्टा प्लस’ने बाधित झाले त्यांच्याकडून हा आजार खूप जास्त प्रमाणात पसरलेला नाही. ‘डेल्टा’पेक्षा हा कमी संसर्गाचा असल्याचेही पुढे येत आहे. यामुळे ‘डेल्टा प्लस’ला घाबरण्याचे कारण नाही.