धन्य नागपूर पोलीस, रॉकेलचा काळाबाजार करणाऱ्या महिलेला १४ वर्षांनी अटक

By योगेश पांडे | Published: July 11, 2023 05:42 PM2023-07-11T17:42:49+5:302023-07-11T17:43:26+5:30

ईमामवाडा पोलीस ठाण्याच्या पथकाने तिला ताब्यात घेतले

Dhanya Nagpur police, black market kerosene woman arrested after 14 years | धन्य नागपूर पोलीस, रॉकेलचा काळाबाजार करणाऱ्या महिलेला १४ वर्षांनी अटक

धन्य नागपूर पोलीस, रॉकेलचा काळाबाजार करणाऱ्या महिलेला १४ वर्षांनी अटक

googlenewsNext

नागपूर : रॉकेलचा काळाबाजार करणाऱ्या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या एका महिलेला तब्बल १४ वर्षांनी अटक करण्यात आली आहे. तिच्याविरोधात २००९ साली गुन्हा दाखल करण्यात आला होता व त्यानंतर दोन नावे असल्याचा फायदा घेत ती पोलिसांना गुंगारा देत होती. ईमामवाडा पोलीस ठाण्याच्या पथकाने तिला ताब्यात घेतले आहे.

११ सप्टेंबर २००९ साली ईमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चंदननगर येथे वकीलपेठ येथील संघपाल दादाजी मेश्राम (१९) व प्रदीप वामनराव राऊत (२३) या दोघांना ७० लीटर रॉकेलचा काळाबाजार करताना अटक करण्यात आली होती. त्यांच्याविरोधात जीवनावश्यक वस्तू कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. चौकशीदरम्यान त्यांनी रॉकेल हे लक्ष्मीबाई उर्फ लताबाई सुनिल शिंगाडे (४५, चंदननगर) हिच्याकडून खरेदी केल्याची बाब समोर आली होती. तिचे स्वत:चे रॉकेल वाटप केंद्र होते. पोलिसांनी तिच्याविरोधातदेखील गुन्हा दाखल केला होता. मात्र दोन नावे असल्याचा फायदा घेत तिने पोलिसांना गुंगारा दिला होता. त्यानंतर हे प्रकरण थंडबस्त्यात गेले होते.

पोलीस आयुक्तांनी फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी मोहीम राबविण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याअंतर्गत या प्रकरणाची फाईल उघडण्यात आली व आरोपी लक्ष्मीबाईचा शोध घेण्यात आला. खबऱ्यांच्या नेटवर्कच्या माध्यमातून पोलिसांनी तिचा शोध घेतला व तिला अखेर अटक करण्यात आली. पोलीस उपायुक्त विजयकांत सागर, सहायक पोलीस आयुक्त भटकर व वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत माने यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक कोल्हारे, गणेश गुगलकर, अमित पात्रे, विरेंद्र गुडरांधे, भगवती ठाकूर, चंद्रशेखर डेकाटे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Web Title: Dhanya Nagpur police, black market kerosene woman arrested after 14 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.