हा धापेवाडा-वरोडा पांदण रस्ता आहे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:12 AM2021-08-20T04:12:57+5:302021-08-20T04:12:57+5:30
कळमेश्वर : तालुक्यातील धापेवाडा- वरोडा पांदण रस्त्यावरील नाल्यातील पाण्यातून मार्ग काढत शेतकऱ्यांना जीवघेणा प्रवास करावा लागतो. यामुळे येथे पूल ...
कळमेश्वर : तालुक्यातील धापेवाडा- वरोडा पांदण रस्त्यावरील नाल्यातील पाण्यातून मार्ग काढत शेतकऱ्यांना जीवघेणा प्रवास करावा लागतो. यामुळे येथे पूल बांधण्यात यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. या समस्येकडे स्थानिक लोकप्रतिनिधीकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
तालुक्यातील नागरिकांचे उदरनिर्वाहाचे मुख्य साधन शेती आहे. वर्षभर शेती मशागत करण्यासाठी उपलब्ध रस्त्यांनी त्यांना वहिवाट करावी लागते. परंतु शासन व लोकप्रतिनिधींनी या पांदण रस्त्यांच्या मजबुतीकरणाकडे दुर्लक्ष केल्याने शेतकऱ्यांना चिखलातून वाट काढत शेतात जावे लागते. धापेवाडा ते वरोडा असा पांदण रस्ता आहे. या पांदण रस्त्यापैकी धापेवाडा शिवारातील अर्ध्या पांदण रस्त्याचे खडीकरण २००५ मध्ये करण्यात आले होते. तर वरोडा शिवारात येणाऱ्या पांदण रस्त्याचे मातीकाम करण्यात करण्यात आले आहे. या पांदण रस्त्याला जाम नाला आडवा गेला आहे. या नाल्याला उबाळी समोरून पाणी येत असते. याच नाल्यावर काही अंतरावर सिमेंट बंधारा बांधण्यात आला आहे. या बंधाऱ्यावर मोठ्या प्रमाणात पाणी अडल्याने हा नाला नेहमीच तुडुंब भरून राहतो. यामुळे धापेवाडा येथील शेतकऱ्यांची वरोडा शिवारात असलेल्या शेतीची मशागत करण्यासाठी याच नाल्यातील पाण्यातून प्रवास करावा लागतो.
पावसाळ्याच्या दिवसात या नाल्यातून शेतीउपयोगी साहित्याची ने-आण कशी करावी असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा ठाकतो. तर या पाण्यातून शेतीत पेरणी, निंदन, खत देणे इत्यादी कामासाठी महिला कामगार नकार देत असल्याने शेतकऱ्यांपुढे पिकांच्या मशागतीचासुद्धा प्रश्न उभा ठाकतो. वरोडा-धापेवाडा मार्गावरील पोल्ट्री फार्म जवळून या पांदण रस्त्याला जोडणाऱ्या रस्त्यांचे सिमेंटीकरण करण्यात येत आहे. धापेवाडा शिवारात असलेल्या लोकप्रतिनिधीच्या शेताकडे जाण्यासाठी पांदण रस्त्याचे नव्याने बांधकाम सुरू आहे. परंतु वडिलोपार्जित शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या समस्येकडे डोळेझाक करण्यात येत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.