धर्मभास्कर रथयात्रेने नागपुरातील रेशीमबाग परिसर दुमदुमला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2023 10:01 PM2023-01-10T22:01:41+5:302023-01-10T22:04:07+5:30
Nagpur News श्री गुरुमंदिर नागपूर प्रणीत स्वामी विष्णुदास स्वामी महाराज अध्यात्म केंद्राच्या वतीने काढण्यात आलेल्या भव्य धर्मभास्कर रथयात्रेने मंगळवारी रेशीमबाग परिसर दुमदुमला.
नागपूर : संकेश्वर पीठाचे जगद्गुरू पूज्यपाद शंकराचार्य सच्चिदानंद अभिनव विद्यानरसिंह भारती यांनी जाहीर केलेला ‘धर्मभास्कर’ हा सन्मान सद्गुरुदास महाराज यांना बुधवारी प्रदान केला जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर श्री गुरुमंदिर नागपूर प्रणीत स्वामी विष्णुदास स्वामी महाराज अध्यात्म केंद्राच्या वतीने काढण्यात आलेल्या भव्य धर्मभास्कर रथयात्रेने मंगळवारी रेशीमबाग परिसर दुमदुमला. महाराष्ट्र, गुजरात अशा विविध राज्यांतून आलेल्या हजारो उपासकांनी रथयात्रेत सहभाग नोंदविला.
व्हिनस स्पोर्ट्स असोसिएशन मैदानावरून या भव्य रथयात्रेला प्रारंभ झाला. अग्रभागी असलेल्या अश्वारूढ धर्म ध्वज, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज व त्यांच्या मागोमाग येणाऱ्या शिवकालीन मर्दानी खेळ व भगवे फेटे आणि धर्मध्वज घेतलेल्या ५० उपासकांनी रथयात्रेचे नेतृत्व केले. फटाक्यांची आतषबाजी, शंखनाद, लेझीम, ढोल-ताशाच्या गजराने संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. परिसरातील नागरिकांनी अंगणात सडा, रांगोळ्या काढून रथयात्रेचे मंगलमय स्वागत केले.
रथेयात्रेत संतांचे पाच रथ सहभागी झाले होते. पहिल्या रथात कंपाली पीठाचे आचार्य नारायणविद्या भारती, अमृताश्रम महाराज विराजमान होते, तर दुसऱ्या रथात विष्णुदास महाराजांची प्रतिमा ठेवण्यात आली होती. या रथात सद्गुरुदास महाराज विराजमान झाले होते अन्य तीन रथांमध्ये प्रज्ञाचक्षू मुकुंदकाका जाटदेवळेकर, बाबामहाराज तराणेकर, गोविंद महाराज, दत्तगिरी महाराज, योगश्री कालिदास महाराज, बब्रू महाराज, अवधूत गिरी महाराज, नागेशशास्त्री अंबुलगे नंदी महाराज, भागवत महाराज, राधिकानंद सरस्वती, राहुल फाटे, छोटे बालकदास माहात्यागी महाराज, हिमालय योगी सदानंदगिरी महाराज, भगिरथी महाराज यांची उपस्थिती होती. रथयात्रेचे समालोचन श्रद्धा भारद्वाज व स्वाती हुद्दार यांनी केले.
..............