अखेर धर्मेश धवनकर सक्तीच्या रजेवर; विद्यापीठाची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2022 11:18 AM2022-12-03T11:18:18+5:302022-12-03T11:22:24+5:30
नोटीसच्या उत्तराने विद्यापीठ प्रशासन असमाधानी
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूरविद्यापीठाच्या सात विभाग प्रमुखांकडून खंडणी वसूल केल्याप्रकरणी जनसंवाद विभागाचे प्रा. डॉ. धर्मेश धवनकर यांच्याविरुद्ध कारवाई करीत विद्यापीठ प्रशासनाने त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवले.
७ जानेवारीपर्यंत त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले असून, तोपर्यंत त्यांना विद्यापीठ परिसरातही बंदी घालण्यात आल्याचे सांगितले जाते. यासंदर्भात विद्यापीठ प्रशासनाने अधिकृत कळविलेले नाही. मात्र, प्रशासनातील एका वरिष्ठ सूत्राने ही बाब स्पष्ट केली आहे. शुक्रवारी यासंदर्भातील पत्र जारी झाल्याचेही या सूत्राचे म्हणणे आहे.
डॉ. धर्मेश धवनकर यांच्याविरोधात विद्यापीठातील सात विभाग प्रमुखांनी कुलगुरूंकडे तक्रार केली होती. या तक्रारीनुसार धवनकर यांनी विभाग प्रमुखांना खोट्या तक्रारींची भीती दाखवून त्यांच्याकडून लाखो रुपयांची खंडणी वसूल केली. यासंदर्भात सातही विभाग प्रमुखांनी एकत्रितपणे कुलगुरूंकडे तक्रार केली. विद्यापीठ प्रशासनाने सुरुवातीला याकडे दुर्लक्ष केले. वृत्तपत्रांमध्ये बातम्या छापून आल्यानंतर कारणे दाखवा नोटीस जारी केली. सुरुवातीला तीन दिवसांत उत्तर सादर करण्यास सांगितले. त्यानंतर पुन्हा सात दिवसांची मुदतवाढ दिली.
गेल्या २८ नोव्हेंबर रोजी धवनकर यांनी नोटीसला उत्तर दिले; परंतु या उत्तराने प्रशासनाचे समाधान न झाल्याने प्रशासनाने त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याची कारवाई केली. चौैकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवल्याचे सांगितले जाते.