अखेर धर्मेश धवनकर यांच्याकडून जनसंपर्क अधिकारी पदभार काढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2022 11:18 AM2022-11-15T11:18:00+5:302022-11-15T11:25:08+5:30
विद्यापीठ खंडणी वसुली प्रकरण : नोटीस जारी- तीन दिवसांत उत्तर सादर करण्याचे आदेश
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने अखेर खंडणी वसुलीच्या तक्रारीची गंभीर दखल घेत जनसंवाद विभागातील सहायक प्राध्यापक धर्मेश धवनकर यांच्याकडून जनसंपर्क अधिकारी पदाचा प्रभार काढून घेतला. तसेच त्यांना कारणे दाखवा नोटीस जारी करून तीन दिवसांत खुलासा करण्याचे आदेश बजावले.
धवनकर यांनी लैंगिक छळाच्या बनावट तक्रारींची भीती दाखवून आपल्याकडून लाखो रुपयाची खंडणी वसूल केल्याची तक्रार राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील सात उच्चपदस्थ विभागप्रमुखांनी कुलगुरूंकडे केली होती. परंतु, त्यावर काही कारवाई होत नसल्याने प्रशासनाविरोधातही संशय वाढत होता. अखेर सोमवारी कुलगरू डॉ. सुभाष चौधरी यांनी याप्रकरणी कारवाई केली. धवनकर यांच्याकडून जनसंपर्क अधिकारी पदभार काढला. त्यांना नोटीस जारी करीत सात दिवसांत उत्तर सादर करण्याचे आदेश बजावले. तसेच तक्रारकर्ते सातही विभागप्रमुखांशी चर्चा केली. यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, सर्वप्रथम त्यांना खुलासा मागवण्यात येईल. त्यानंतर प्राथमिक चौकशी केली जाईल. त्यानंतर विभागीय चौकशी केली जाईल, असे स्पष्ट केले.
- कुलगुरूंना करा तक्रार, परिपत्रक जारी
या प्रकरणानंतर नवनवीन तक्रारींचे खुलासे होत आहेत. प्रमोशन व इतर कामासाठी कुलगुरुंपर्यंत पैसे द्यावे लागत असल्याची नवीनच तक्रार कुलगुरुंच्या कानावर पडली. कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी स्वत: या गोष्टीचा खुलासा केला. विद्यापीठ प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेतली असून, यासंदर्भात सोमवारी एक परिपत्रकच जारी केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
विद्यापीठातील विभागप्रमुख, शिक्षक अधिकारी व कर्मचाऱ्यांना काही व्यक्ती विविध प्रकारच्या धमक्या (उदा. कॅस, पदोन्नती प्रकरण, लैंगिक शोषण प्रकरणे), आदी देऊन त्यांच्याकडून खंडणी स्वरूपात रक्कम वसूल करण्यात येत असेल तर अशा धमकी व प्रलोभनाला बळी न पडता त्यांची तक्रार थेट कुलगुरुंना करावी, असे या पत्रकाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.
- तातडीने निलंबित करण्याची मागणी
दरम्यान, खंडणी वसुली प्रकरण अतिशय गंभीर असून, या प्रकरणी धर्मेश धवनकर यांना तातडीने निलंबित करण्यात यावे. तसेच या प्रकरणाची चौकशी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या माध्यमातून करावी, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँगेसने केली असून, या मागणीचे निवेदन सोमवारी कुलगुरूंना सादर करण्यात आले. शहर जिल्हा अध्यक्ष शैलेंद्र तिवारी यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळात अनिल बोकडे, सुमित बोडखे पाटील, विश्वजित सावडिया, निशांत निमजे, प्रणव म्हैसेकर, शीतल किरजवलेकर, आदींचा समावेश होता.