धीरूभाई अंबानी एरोस्पेस पार्क : मिहान जागतिक नकाशावर
By admin | Published: August 30, 2015 02:37 AM2015-08-30T02:37:40+5:302015-08-30T02:37:40+5:30
रिलायन्स एअरोस्ट्रक्चर लिमिटेडच्या धीरूभाई अंबानी एरोस्पेस पार्कला २८९ एकर जागा मिळाली आहे. त्यांना आणखी ११० एकर जागा हवी आहे.
आता खऱ्या अर्थाने मिहानला ऊर्जा!
नागपूर : रिलायन्स एअरोस्ट्रक्चर लिमिटेडच्या धीरूभाई अंबानी एरोस्पेस पार्कला २८९ एकर जागा मिळाली आहे. त्यांना आणखी ११० एकर जागा हवी आहे. पहिल्यांदाच एवढा मोठा उत्पादन प्रकल्प मिहानमध्ये उभा राहणार आहे. नागपूर कुठे आहे, याची माहिती विदेशी उद्योजकांंना नसली तरी ‘मिहान’ची परिपूर्ण माहिती असल्याचे अनिल अंबानी यांनी शुक्रवारच्या कार्यक्रमात म्हटले होते. त्यामुळे रिलायन्समुळे मिहानला खऱ्या अर्थाने ऊर्जा मिळाली आहे.
अनिल अंबानी खरे अॅम्बेसडर!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रिलायन्स एअरोस्ट्रक्चर कंपनीला जागेचे पत्र सोपविताना अनिल अंबानी हे मिहानचे ब्रॅण्ड अॅम्बेसडर असल्याचे सांगितले होते. तसे पाहता अनिल अंबानी हेच मिहानचे खरे अॅम्बेसडर ठरले आहेत. मिहानमध्ये देशविदेशातील कंपन्यांनी उद्योग सुरू करावेत, यासाठी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी किती गंभीर आहेत, याची प्रचिती मिहानमधील जागेच्या हस्तांतरण कार्यक्रमात उपस्थितांना आली. बोर्इंग इंडियाचे मिहानमध्ये होणारे पुनर्आगमन, कतार एअरलाईन्सची नागपूर-दोहा विमानसेवा, इतिहाद एअरलाईन्सची कार्गो सेवा, नागपूर विमानतळासाठी जागतिक निविदा आदी प्रश्नांवर कार्यक्रमात व्यासपीठावरील नेते गंभीर दिसून आले. त्यांच्यामुळेच मिहानला बूस्ट मिळाला आहे. रिलायन्स कंपनीच्या पाठोपाठ मिहान-सेझमध्ये नवीन वा विस्तारीकरण उद्योग सुरू करण्यासाठी कंपन्यांची लगबग वाढली आहे. पण उपलब्ध जागेचा प्रश्न मोठा मुद्दा ठरणार आहे. सहा ते आठ वर्षांपासून मिहानमध्ये जागा विकत घेऊन उद्योग सुरू न केलेल्या कंपन्यांकडून जागा परत घेण्याच्या प्रक्रियेला आता वेग येणार आहे.
७०० एकर जागा अडून
गेल्या काही वर्षांत प्रत्यक्ष काम सुरू न केलेल्या मिहानमधील नामांकित कंपन्यांची जवळपास ७०० एकर जमीन परत घेण्याची कारवाई महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी (एमएडीसी) करीत असून या कंपन्यांना नोटिसा पाठविल्या आहेत. एमएडीसीने सक्तीची कारवाई सुरू केली आहे. बोर्डाच्या बैठकीत जमीन परत घेण्यासाठी पाच महिन्यांपूर्वीच धोरण तयार करून एमएडीसीने ३३ कंपन्यांना कारणे दाखवा नोटीसा पाठविल्या आहेत. बहुतांश कंपन्यांनी आर्थिक अडचणीची उत्तरे दिली आहेत. पण आता थातूरमातूर उत्तरांनी काम चालणार नाही.
नामांकित कंपन्यांना नोटीस
टेक महिंद्र कंपनीकडे १५९ एकर जागा आहे. ही कंपनी केवळ ५ एकर जागेवर बांधकाम करीत आहे. याशिवाय डीएलएफ १४० एकर आणि एचसीएलने १४० एकर जागा खरेदी केली आहे. एमएडीसीने डीएलएफ, एचसीएल, विप्रो, मॅक्स एअरोस्पेस, ड्यूक एअरोस्पेस आदींसह ३३ कंपन्यांना नोटीसा पूर्वीच दिल्या आहेत. या कंपन्या आर्थिक मंदी आणि विजेचा अभाव असल्याची कारणे देत होती. पण आता आर्थिक मंदीही नाहीच, शिवाय प्रति युनिट ४.४० रुपये दराने विजेचा निरंतर पुरवठा होत आहे. यामुळे या कंपन्यांना उद्योग सुरू करण्याशिवाय पर्याय नाही.