धोनी प्रतिभावान खेळाडूंना नागपुरात प्रशिक्षण देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 09:47 AM2018-03-27T09:47:33+5:302018-03-27T09:48:28+5:30
एमएस धोनी क्रिकेट अकादमीने मध्य भारतात पहिली अकादमी नागपुरात सुरू करण्याचा मनोदय व्यक्त केला असून वर्धा मार्गावर गायकवाड -पाटील इंटरनॅशनल शाळेच्या परिसरात निवासी प्रशिक्षणाची सोययेत्या सप्टेंबरपासून उपलब्ध होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नव्या दमाचे खेळाडू घडविण्यासाठी भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी खेळाडू महेंद्रसिंग धोनी हा पुढाकार घेत आहे. एमएस धोनी क्रिकेट अकादमीने मध्य भारतात पहिली अकादमी नागपुरात सुरू करण्याचा मनोदय व्यक्त केला असून वर्धा मार्गावर धुटी शिवारात असलेल्या गायकवाड -पाटील इंटरनॅशनल शाळेच्या परिसरात एसजीआर स्पोर्टस् अकादमीतर्फे निवासी प्रशिक्षणाची सोय लवकरच येत्या सप्टेंबरपासून उपलब्ध होणार आहे.
२००० साली १९ वर्षांखालील विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचे खेळाडू आणि एमएस धोनी अकादमीचे व्यवस्थापकीय संचालक मिहिर दिवाकर यांनी सोमवारी पत्रकारांना ही माहिती दिली. धोनी सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्यात व्यस्त आहे, पण वेळ मिळेल तसा तो युवा खेळाडूंना मार्गदर्शन करण्यास येथे येईल, असे दिवाकर यांनी सांगितले.
याआधी लखनौ, वाराणसी, नोएडा आणि बोकारो येथे अकादमी उघडण्यात आली असून निवासी स्वरूपाची नागपुरात पहिली अकादमी असेल. येथे खेळाडूंना शिक्षणाचीही सोय राहील, असे ते म्हणाले.
सात वर्षांखालील मुलांना येथे प्रवेश दिला जाईल. याशिवाय महिला क्रिकेटला प्रोत्साहन म्हणून चाचणीच्या माध्यमातून निवडण्यात येणाऱ्या स्थानिक ११ क्रिकेटपटूंना मोफत प्रशिक्षणाची सोय उपलब्ध करून देण्यात येईल, अशी घोषणा त्यांनी केली. या परिसरात सुसज्ज असे मैदान तयार करण्यात आले असून ४०० खेळाडूंच्या निवासाचीदेखील व्यवस्था असल्याचे गायकवाड- पाटील ग्रुपचे चेअरमन मोहन गायकवाड यांनी सांगितले. एसजीआर स्पोर्टस् अकादमीचे प्रमुख मंगेश राऊत यांनी सांगितले की अकादमीतील मुलांना राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येईल. यावेळी धोनी अकादमीचे आॅपरेशन हेड सोहेल रौफ, लवलेश राऊत, शाळेच्या प्राचार्य शाबिह चौरसिया यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.