अल्पवयीन मुले चालवितात ‘धूम स्टाईल’ बाईक
By Admin | Published: February 19, 2016 03:16 AM2016-02-19T03:16:44+5:302016-02-19T03:16:44+5:30
वाहतूक नियम आणि मोटरवाहन कायद्याचे धडधडीत उल्लंघन करीत अल्पवयीन मुले अधिकृत परवान्याविना ‘धूम
नागपूर : वाहतूक नियम आणि मोटरवाहन कायद्याचे धडधडीत उल्लंघन करीत अल्पवयीन मुले अधिकृत परवान्याविना ‘धूम स्टाईल’ वाहने चालवित आहेत. नागपूरच्या रस्त्यांवर १२ लाख दुचाकी वाहने धावत आहेत. बहुतांश वाहनचालक वाहतूक नियमांचे उल्लंघन करीत आहेत. २०१४ मध्ये ५ हजार ४६ दुचाकी वाहनस्वारांनी रस्त्यांवरील अपघातात आपले प्राण गमावलेले आहे.
उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई आणि न्यायमूर्ती प्रदीप देशमुख यांच्या खंडपीठाने हा गंभीर विषय स्वत:हून जनहित याचिका म्हणून स्वीकारून केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालय, राज्य वाहतूक विभाग, वाहतूक आयुक्त, आरटीओ, नासुप्र, मनपा आणि शिक्षण सचिवांना तीन आठवड्यात उत्तर दाखल करणारी नोटीस जारी केली. आपले दुचाकी वाहन घेऊन शिकवणी वर्गाला जात असताना एका १५ वर्षीय मुलाने रस्त्याने जात असलेल्या एका महिलेला धडक दिली होती. तिच्या डोक्याला जबर दुखापत झाली होती. तिला एका खासगी इस्पितळात दाखल करताच तिचा मृत्यू झाला होता. या प्राणांतिक अपघातास कारणीभूत ठरलेला हा मुलगा अल्पवयीन असल्याने त्याच्याविरुद्ध प्रथम खबरी अहवाल दाखल झाला नाही.
त्याला बाल हक्क कायद्याचे संरक्षण मिळाले. त्याला बाल न्याय मंडळापुढे हजर करून कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. या बालकाविरुद्धचे आरोपपत्र रद्द करण्यात यावे, या मागणीसाठी त्याच्या आई-वडिलाने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने हे प्रकरण वेगळे ठेवले होते. शेकडो मुले मोटरसायकली आणि जास्त अश्व शक्तीच्या स्कूटर कोणत्याही अधिकाराविना चालवितात. या गंभीर प्रकारावर उच्च न्यायालयाने अॅड. श्रीरंग भांडारकर यांना न्यायालय मित्र नेमून सर्वंकष याचिका दाखल करण्यास सांगितले होते. त्यानुसार त्यांनी ही जनहित याचिका दाखल केली.
आज शाळा, महाविद्यालय आणि शिकवणी वर्गाला जाणाऱ्या अल्पवयीन मुलांच्या हातात पालक मोटरसायकल किंवा स्कूटरच्या चाव्या देतात. रस्त्याने जाताना ही मुले भरधाव आणि बेदरकारपणे वाहने चालवितात आणि अपघाताला निमंत्रण देतात. १६ वर्षाच्या मुलांना ५० सीसी इंजीन असलेले दुचाकी वाहन चालविण्याचा परवाना मिळू शकतो. परंतु आज ही मुले १०० ते १५० सीसीचे इंजीन असलेली वाहने भररस्त्यांवर चालवितात. त्यामुळे गंभीर चित्र निर्माण होत आहे. त्यामुळे मुलांकडून धूम स्टाईल वाहने चालविण्याचा प्रकार रोखणे आवश्यक आहे, असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे.
न्यायालयात न्यायालय मित्र म्हणून अॅड. श्रीरंग भांडारकर, राज्य सरकारच्या वतीने सहायक सरकारी वकील कल्याणी देशपांडे तर केंद्र सरकारच्या वतीने अॅड. मुग्धा चांदूरकर यांनी बाजू मांडली. (प्रतिनिधी)