ध्रुपद आणि तालाने थिरकला महोत्सव
By Admin | Published: August 1, 2014 01:14 AM2014-08-01T01:14:20+5:302014-08-01T01:14:20+5:30
डॉ. वसंतराव देशपांडे स्मृती संगीत महोत्सवाचा आजचा दुसरा दिवस प्राचीन परंपरेच्या ध्रुपद - धमार गायनासह पखवाज व तबलावादनाच्या खुमासदार जुगलबंदीने संस्मरणीय ठरला.
वसंतराव देशपांडे संगीत महोत्सव : रसिकांची दाद
नागपूर : डॉ. वसंतराव देशपांडे स्मृती संगीत महोत्सवाचा आजचा दुसरा दिवस प्राचीन परंपरेच्या ध्रुपद - धमार गायनासह पखवाज व तबलावादनाच्या खुमासदार जुगलबंदीने संस्मरणीय ठरला. सध्या विस्मरणात गेलेली आणि काहीशी दुर्मिळ झालेली ध्रुपद गायकी रसिकांना आध्यात्मिक आनंदाची अनुभूती देणारी होती तर पखवाज व तबलावादनाची जुगलबंदी तालाच्या आनंदात चिंब करणारी होती. दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्यावतीने हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित महोत्सवाचा आजचा दुसरा दिवस ध्रुपदच्या अनुभूतीने आणि तालाच्या जुगलबंदीने थिरकला.
ध्रुपद गायन शैलीचे प्रतिभावंत बंधूद्वय गायक पद्मश्री पं. उमाकांत आणि पं. रमाकांत गुंदेचा यांच्या प्रासादिक गायनाने प्रथम सत्राला प्रारंभ करण्यात आला. बदलत्या काळानुरूप शास्त्रीय गायन शैलीत होणारे बदल आणि श्रोत्यांचीही बदलत जाणारी अभिरुची हे एक आव्हान आहे. पण यात आपले मूळ संगीत टिकवून त्याची गोडी रसिकांना लागावी म्हणून प्रयत्न करण्याची गरज आहे, कारण ध्रुपद हे संगीताचे मूळ आणि आपली संस्कृती आहे, असे गुंदेचा बंधू म्हणाले. त्यानंतर आपल्या प्रणलक्षी स्वरांनी या विश्वविख्यात कलावंतांनी प्राचीन शैलीच्या ध्रुपद गायनाने रसिकांना आनंद दिला. ध्रुपदचा प्रचार व प्रसार हेच सुवर्णसंचित आणि आपले प्रारब्ध आहे, असे ते मानतात. गुरुशिष्य परंपरेतून ध्रुपद गुरू उस्ताद झिया फरिउद्दीन डागर आणि उस्ताद झिया मोहोउद्दीन यांचे शिष्य असलेल्या या गायकांनी आपल्या सादरीकरणाने रसिकांना संतृप्त केले.
पारंपरिक नोमतोम आलापीने आरंभित केलेल्या ‘तदन रिदन तोम...’ या शब्दस्वरांसह विस्तारितील केलेल्या आणि मृदंगम वाद्यासह घुमणाऱ्या जोरकस गंभीर आलापीसह त्यांनी गायनाला प्रारंभ केला. जोरकस आलापीमुळे होणाऱ्या स्वरलगावांवरील गायकांचे नियंत्रण वादातीत होते. अंगभूत लयकारीसह सादर होणाऱ्या सध्याच्या ऋतुनुरूप राग मियामल्हारचे विलोभनीय दर्शन त्यांच्या गायकीतून घडले. बोलतानेतून घडणारे गमक अंगाचे दर्शन, अप्रतिम स्वरन्यास व सतेज स्वरांसह रसिकल्या बंदिशीसह विलंबित धमार ‘वंदन भिजे भीजे सारी...’ आणि द्रुततालात ‘झर झर बरसे बुंदनिया...’ या गायकांनी सादर करताना रसिकांना अमृतसिद्धी अनुभूतीचा प्रत्यय दिला. त्यानंतर राग चारुकेशीतील शुलतालातील प्रसन्न अनुभूतीचे भजन ‘झिनी झिनी चादरिया केहे के ताना काहे के बरनी...’ सादर करून त्यांनी गायनाचा समारोप केला. त्यांना पं. अखिलेश गुंदेचा यांची पखवाजवर साथसंगत लाभली.
यानंतरच्या सत्रात विख्यात तबलावादक आणि जयपूर घराण्याचे वादक पं. भवानी शंकर यांचे पखवाजवादन आणि दिल्ली घराण्याचे पं. योगेश समशी यांच्या तबलावादनाची जुगलबंदी रंगली. खुमासदार व वीररसाच्या शंकर तांडवाच्या आणि शृंगाररसाच्या बंदिशींसह जुगलबंदीला प्रारंभ झाला. या तालवादनाने महोत्सव अधिक उंचावर गेला. चक्रदार, कायदा, पेशकार आदी वादनाच्या विविध प्रकारांनी हे वादन समृद्ध होते. त्यांना चिन्मय कोल्हटकर यांनी संवादिनीवर साथसंगत केली. या सत्राचे निवेदन शुभांगी रायलु यांनी केले.
कार्यक्रमाला न्या. भूषण गवई, न्या. प्रसन्न वऱ्हाडे, देवेंद्र पारिख, नाटककार महेश एलकुंचवार, उद्योजक विलास काळे, अवंतिका चिटणवीस, केंद्र संचालक डॉ. पीयुषकुमार उपस्थित होते. कलावंतांचे स्वागत अतिथींच्या हस्ते करण्यात आले. दोन्ही सत्राला रसिकांची गर्दी केली. (प्रतिनिधी)