धुलिवंदन : शहरातील चौकाचौकात राहणार पोलीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2019 11:55 PM2019-03-20T23:55:03+5:302019-03-20T23:57:03+5:30
धुलिवंदनाच्या पर्वावर दारूच्या नशेत गोंधळ घालणाऱ्या, महिला-मुलींसोबत लज्जास्पद वर्तन करू पाहणाऱ्यांना तसेच सणोत्सवाच्या आनंदाला गालबोट लावू पाहणाऱ्यांना पोलीस चांगला धडा शिकविणार आहेत. धुळवडीच्या आडून कुणी उपद्रव करताना आढळल्यास त्यांची चांगली खातर करा तसेच अवैध दारू विक्री करणाऱ्यांच्या मुसक्या बांधून त्यांचे अवैध गुत्ते उद्ध्वस्त करा, असे कडक आदेश पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी शहरातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सर्व ठाणेदारांना दिले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : धुलिवंदनाच्या पर्वावर दारूच्या नशेत गोंधळ घालणाऱ्या, महिला-मुलींसोबत लज्जास्पद वर्तन करू पाहणाऱ्यांना तसेच सणोत्सवाच्या आनंदाला गालबोट लावू पाहणाऱ्यांना पोलीस चांगला धडा शिकविणार आहेत. धुळवडीच्या आडून कुणी उपद्रव करताना आढळल्यास त्यांची चांगली खातर करा तसेच अवैध दारू विक्री करणाऱ्यांच्या मुसक्या बांधून त्यांचे अवैध गुत्ते उद्ध्वस्त करा, असे कडक आदेश पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी शहरातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सर्व ठाणेदारांना दिले आहेत.
नागरिकांना शांततेत आणि उत्साहात होळी-धूळवड साजरी करता यावी म्हणून शहर पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला आहे. त्यासाठी सुमारे अडीच हजार पोलीस चौकात राहतील अन् गल्लीबोळात गस्तही करणार आहेत. बुधवारी शहरात ७८७ ठिकाणी सार्वजनिक होळी पेटविण्यात आल्या. धुळवडीच्या दिवशी भल्या सकाळपासून ५ पोलीस उपायुक्त, १० सहायक आयुक्त, ४० पोलीस निरीक्षकांच्या नेतृत्वात २५०० पोलीस बंदोबस्ताचा मोर्चा सांभाळणार आहेत.
दारूच्या नशेत बेदरकारपणे वाहन चालविणारे, गोंधळ घालणारे, महिला-मुलींची छेड काढणारे किंवा कसल्याही प्रकारे उपद्रव करून सणोत्सवाच्या उत्साहाला गालबोट लावण्याचा प्रयत्न करू पाहणाऱ्यांना आवरण्यासाठी पोलिसांनी उपाययोजना केल्या आहेत. कलम १४४ लागू करण्यात आले आहे. त्यामुळे पाचपेक्षा जास्त लोक सार्वजनिक ठिकाणी एकत्रित राहू शकणार नाही. पोलिसांचा चौकाचौकात बंदोबस्त राहील. ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात येणार असून फिक्स पॉईंटही लावण्यात येणार आहेत. प्रत्येक पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी वाहनांसोबतच पायीदेखील गस्त करतील. बीट मार्शलना अधिक सतर्कतेने गस्त करण्याचे आदेश देण्यात आले आहे.
दारूच्या गुत्त्यांवर खास नजर
दारूची दुकाने बंद असल्यामुळे हातभट्टीवाले, अवैध दारू विकणारे मोठा साठा जमवून ठेवतात. या गुत्त्यावर एकाच वेळी दारू घेणाऱ्यांची मोठी गर्दी जमते. त्यात गुन्हेगार मोठ्या संख्येत असतात. हे गुन्हेगार दारूच्या नशेत अवैध शस्त्राच्या धाकावर लुटमार, विनयभंग तसेच अन्य गंभीर गुन्हे करतात. त्यामुळे अवैध दारू गुत्त्यांवर खास नजर ठेवण्याचे आदेश पोलीस आयुक्त डॉ. उपाध्याय यांनी शहरातील पोलिसांना दिले आहे; सोबतच नागरिकांना होळी-धुळवडीच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.