उपराजधानीत धुळवड जल्लोषात : कोरोना व्हायरसवर गुलालाचे रंग पडले भारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2020 08:36 PM2020-03-11T20:36:23+5:302020-03-11T20:42:23+5:30
नागपूरकरांनी होळीच्या दुसऱ्या दिवशी असलेल्या धुळवडीची मजा घेतली. सकाळपासूनच रस्तोरस्ती, घरोघरी गुलाल उधळण्याचा आणि एकमेकांना रंग लावून परंपरेचा जल्लोष संबंध नागपुरात सुरू होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जगभरात थैमान घालणाऱ्या संसर्गजन्य कोरोना व्हायरसने भारतातही पाय पसरण्यास सुरुवात केली आहे. याबाबत नागपूरकर अनभिज्ञ आहेत असे नाही. येथेही दररोज संशयितांची तपासणी सुरूच आहे. अशा भयप्रद वातावरणातही संभावित सर्व उपाययोजना करीत नागपूरकरांनी होळीच्या दुसऱ्या दिवशी असलेल्या धुळवडीची मजा घेतली. सकाळपासूनच रस्तोरस्ती, घरोघरी गुलाल उधळण्याचा आणि एकमेकांना रंग लावून परंपरेचा जल्लोष संबंध नागपुरात सुरू होता.
धुळवडीचा जल्लोष होलिका दहनापासून सोमवारीच सुरू झाला. गुलालाची उधळण, रंग लावण्याची चढाओढ आणि होळी गीतांवर नाचण्याची धम्माल सर्वत्र सुरू होती. दरवर्षीपेक्षा नागरिक रंगांबाबत जरा जास्तच जागरूक असल्याचे दिसून येत होते. रासायनिक रंग, चायनीज पिचकाऱ्या आणि पाण्याचा होणारा मारा यंदा कमीच दिसून आला.
बऱ्याच नागरिकांनी कोरोनाच्या दहशतीमुळे घरीच राहणे पसंत केले. त्यामुळे बाहेर रस्त्यांवर अघोषित कर्फ्यू लागल्याचे दिसून येत होते. या सगळ्यात कमाल केली ती तरुण-तरुणींनी. घोळक्या घोळक्याने मुली-मुले बाईकवर फिरत रंगांची उधळण करताना दिसत होते. नैसर्गिक रंग आणि गुलाल लावून जल्लोष साजरा केला जात होता. एकूणच रंगांमध्ये मिसळून सर्व एक होण्याचा हा सोहळा लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांनीच साजरा केला.
पेटत्या होळींभोवती नीरव शांतता
सोमवारी होलिका दहनानंतर अनेकांनी तेथे राहणे टाळल्याचेच दिसून येत होते. कोरोनाच्या दहशतीचाच हा परिणाम म्हणता येईल. धुळवडीला बहुतांश ठिकाणांवर पेटत्या होळींजवळ वस्तीतील नागरिकांची गर्दी असते. मात्र, होळींभोवती नीरव शांतता दिसून येत होती.
मुलींचे बाहेर पडणे सुखावणारे
धुळवडीला मुली बाहेर पडणे म्हणजे धोक्याचे, असा समज आपल्याकडे आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून मुली स्वत: घोळक्याने बाहेर पडताना दिसून येतात. मंगळवारीही अशाच मुली आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत चौकाचौकात रंग खेळताना दिसून येत होत्या. बाईकवरून इतरत्र भटकंती करीत असल्याचे चित्र सुखावह होते. एकमेकांच्या घरी जाऊन रंग खेळण्यासोबतच नाश्त्यावर ताव मारणाऱ्या या युवावर्गाने धुळवडीला एकच जल्लोष केला आणि मुलींनाही असा सोहळा आनंदाने साजरा करण्याचे स्वातंत्र्य प्राप्त झाल्याचे सुखद चित्र होते.