मधुमेह ठरतोय शरीरसंबंधातील अडसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 12:13 PM2018-08-18T12:13:04+5:302018-08-18T12:13:27+5:30
मधुमेह नियंत्रित नसल्यास किंवा बऱ्याच कालावधीपासून हा आजार असल्यास कामेच्छा केंद्रावर त्याचा परिणाम होतो.
सुमेध वाघमारे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मधुमेह नियंत्रित नसल्यास किंवा बऱ्याच कालावधीपासून हा आजार असल्यास कामेच्छा केंद्रावर त्याचा परिणाम होतो. मधुमेहामुळे ‘प्रोलॅक्टिन’ रसायन वाढते. तसेच पुरुषत्वाचा ‘सेक्स हॉर्मोन’ ‘टेस्टोस्टेरॉन’ही कमी होत जातो. परिणामी, कामेच्छा केंद्रावर परिणाम होऊन ती भावना हळूहळू कमी होत जाते. त्यामुळे मधुमेहींच्या कामसंबंधांमध्ये अंतर पडत जाते. दाम्पत्यांच्या संबंधांवरही विपरीत परिणाम होतो. याला घेऊन ‘डायबेटीज केअर अॅण्ड रिसर्च सेंटर’ने केलेल्या निरीक्षणात ‘टाईप २’ मधुमेह असलेल्या १००३ पुरुषांमधून तब्बल ८५ टक्के पुरुषांना, तर २६४ महिलांमधून ६३.३ टक्के महिलांना लैंगिक दोष असल्याचे आढळून आले.
‘डायबेटीज केअर अॅण्ड रिसर्च सेंटर’चे संचालक व प्रसिद्ध मधुमेह तज्ज्ञ डॉ. सुनील गुप्ता यांनी ‘व्हँक्यूअर’ येथे आयोजित ‘वर्ल्ड डायबेटीज काँग्रेस’ मध्ये ‘टाईप २’ मधुमेही स्त्रियांमध्ये लैंगिक संबंधातील अडथळे यावर शोधनिबंध सादर केला. यात २६४ महिलांना शरीरसंबंधाची इच्छा, त्यातील उत्तेजितपणा, स्निग्धीकरण, परमोच्च आनंद, समाधान, वेदना यावर १५ प्रश्न विचारण्यात आले. यात १६६ महिलांना लैंगिक दोष असल्याचे आढळून आले. यात परमोच्च आनंद मिळत नसल्याची व संबंधाच्यावेळी वेदना होत असल्याची टक्केवारी जवळपास सारखीच असल्याचे समोर आले. याच स्वरूपातील निरीक्षण ‘सेंटर’च्यावतीने मधुमेह तज्ज्ञ डॉ. सचिन गाठे यांनी टाईप २’ मधुमेहाच्या पुरुषांवर केले. यावरील शोधनिबंध ‘इंटरनॅशनल डायबेटीज इंडिया कॉन्फरन्स’ कोलकात्ता येथे सादर करण्यात आले होते. यात १००३ पुरुषांमधून ८५ टक्के म्हणजे ८५३ पुरुषांमध्ये लैंगिक समस्या असल्याचे आढळून आले. मधुमेहातील हा सर्वात मोठा दूरगामी परिणाम आहे. याकडे ८० टक्के रुग्ण दुर्लक्ष करीत असल्याने ही गंभीर हृदयविकाराची धोक्याची घंटा ठरत आहे.
२.७ टक्के महिलांमध्ये शरीरसंबंधाची अनिच्छा
या निरीक्षणात, मधुमेहपीडित रजोनिवृत्तीनंतरच्या २.७ टक्के महिलांमध्ये तर रजोनिवृत्तीपूर्वीच्या ३.४ टक्के महिलांमध्ये शरीरसंबंधाची इच्छा कमी झाल्याचे आढळून आले. रजोनिवृत्तीनंतरच्या २.९ टक्के महिलांमध्ये तर राजोनिवृत्तीपूर्वीच्या ३.७ टक्के महिलांमध्ये लैंगिक उत्तेजना कमी झाल्याचे दिसून आले. रजोनिवृत्तीनंतर ३.५ टक्के महिलांना तर रजोनिवृत्तीपूर्वीच्या ४.२ टक्के महिलांना योनीमार्गाच्या कोरडेपणाची समस्या असल्याचे आढळून आले. रजोनिवृत्तीनंतरच्या ३.७ टक्के महिलांना तर रजोनिवृत्तीपूर्वीच्या ४.४ टक्का महिलांना शरीरसंबंधातील परमोच्च आनंद मिळत नसल्याचेही सामोर आले. रजोनिवृत्तीनंतरच्या ४.१ टक्के महिलांना तर रजोनिवृत्तीपूर्वच्या ४.९ महिलांना समाधान मिळत नसल्याचेही पुढे आले. विशेष म्हणजे शरीरसंबंधात येणारे दुखणे दोन्ही गटात ४.१ व ४.५ टक्के एवढे आहे.
पुरुषांमध्ये तंबाखू, धूम्रपानही ठरतेय जबाबदार
पुरुषांमध्ये ५१ ते ६५ या वयोगटात लैंगिक समस्येची टक्केवारी ८५ टक्के आहे. जसजसा मधुमेहाचा कालावधी वाढतो तसतशी ही टक्केवारी वाढत जात असल्याचे डॉ. गाठे यांचे म्हणणे आहे. त्यांच्या मते, या अभ्यासातून बहुसंख्य मधुमेहींमध्ये लैंगिक स्नायूंची अकार्यक्षमता आढळली. मधुमेहाच्या जोडीला वाढतं वय (चाळिशीपुढील), ताण-तणाव, तंबाखू-धूम्रपानाचे व्यसन आदी गोष्टींचाही लैंगिक स्नायूंच्या ‘फिटनेस’वर परिणाम होत असल्याचे या निरीक्षणातून समोर आले.