गर्भावस्थेत मधुमेहाची तपासणी अत्यावश्यक
By admin | Published: July 28, 2014 01:28 AM2014-07-28T01:28:09+5:302014-07-28T01:28:09+5:30
गर्भवतींनी प्रत्येकी तीन महिन्यांच्या अंतराने मधुमेहाची तपासणी केल्यास आणि निदान झाल्यावर योग्य खबरदारी व औषधोपचार घेतल्यास मधुमेहाची रुग्णसंख्या कमी करण्यास हातभार लागू शकतो,
डायबेटीज केअर फाऊंडेशन : दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचा समारोप
नागपूर : गर्भवतींनी प्रत्येकी तीन महिन्यांच्या अंतराने मधुमेहाची तपासणी केल्यास आणि निदान झाल्यावर योग्य खबरदारी व औषधोपचार घेतल्यास मधुमेहाची रुग्णसंख्या कमी करण्यास हातभार लागू शकतो, अशी माहिती प्रसिद्ध मधुमेहतज्ज्ञ डॉ. सुनील गुप्ता यांनी येथे दिली. असोसिएशन आॅफ डायबिटीज एज्युकेटर आणि डायबिटीज केअरच्या संयुक्त विद्यमाने हॉटेल सेंटर पॉर्इंट येथे दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी परिषदेचा समारोप झाला. त्यावेळी ते बोलत होते.
गर्भस्थ शिशु व मातेची काळजी हा परिषदेचा मुख्य विषय होता. डॉ. गुप्ता म्हणाले, गर्भावस्थेत मधुमेह होण्याची ५० टक्के शक्यता असते. गर्भावस्थेत या व्याधीचे निदान न झाल्यास बाळाला विकृती किंवा मृत्यू येऊ शकतो. परंतु निदान झाल्यावर हे टाळणे सहज शक्य आहे. काही महिलांमध्ये बाळंतपणानंतर मधुमेह दूर होतो. मात्र, त्यातल्या काही मातांना वयाच्या साधारण ४० व्या वर्षी ही व्याधी घेरण्याची शक्यता असते. यामुळे निदान झालेल्या गर्भवती आतापासूनच प्रतिबंधात्मक उपाय सुरू करू शकतात. आहार आणि औषधोपचारातून ती माता मधुमेहाला दूर ठेवू शकते.
विशेष म्हणजे, बाळंतपणानंतर मधुमेह असलेल्या माताने बाळाल दूध पाजल्यास त्याला किशोरावस्थेत लठ्ठपणा, रक्तदाब, कोलेस्ट्रॉलची समस्या निर्माण होऊन मधुमेह होण्याची शक्यता अधिक असते. म्हणून गर्भावस्थेत प्रत्येक तीन-तीन महिन्यानंतर मधुमेहाची चाचणी करणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे निदान होऊन मधुमेहाला प्रतिबंध घालणे शक्य आहे. शासनानेही या संदर्भात पुढाकार घेतला आहे. सर्व शासकीय व खासगी रुग्णालयांना गर्भावस्थेत इतर चाचण्यांसोबतच मधुमेहाची चाचणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शासकीय रुग्णालयात तशा सोयीही उपलब्धही करून दिल्या आहेत. याची जनजागृती झाल्यास आणि गर्भवतींनी स्वत:हून याची चाचणी करून घेतल्यास आणि सतर्क राहिल्यास पोलिओसारखेच मधुमेहाला दूर ठेवता येऊ शकते.
दोन दिवसीय या परिषदेत एकूण १० वैज्ञानिक चर्चा आणि ३० हून अधिक व्याख्यानांमधून विषयतज्ज्ञ मधुमेहाच्या क्षेत्रात जगभर सुरू असलेल्या संशोधनावर प्रकाश टाकला. त्यासाठी ३५० हून अधिक डॉक्टर सहभागी झाले होते. प्रमुख वक्त्यांमध्ये डॉ. समर बॅनर्जी (कोलकाता), डॉ. सी. एस. याज्ञिक (पुणे), डॉ. जितेंद्र सिंह (जम्मू), डॉ. शशांक जोशी (मुंबई), डॉ. अजय कुमार (पटणा), डॉ. शैलजा काळे (पुणे), डॉ. उदय थानावाला (मुंबई), डॉ. बन्सी साबू (अहमदाबाद), डॉ. अनुजा माहेश्वरी (लखनौ), डॉ. शोभा गुडी (बंगळूर) यांचा समावेश होता. (प्रतिनिधी)