उपचारापासून नागपुरातील डायलिसिसचे रुग्ण वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 12:03 AM2018-01-13T00:03:22+5:302018-01-13T00:10:14+5:30
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) डायलिसिस सेंटरमध्ये रुग्णांवर उपचार न झाल्याने शुक्रवारी रुग्णांनी चांगलाच गोंधळ घातला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) डायलिसिस सेंटरमध्ये रुग्णांवर उपचार न झाल्याने शुक्रवारी रुग्णांनी चांगलाच गोंधळ घातला. या सेंटरमध्ये मागील काही दिवसांपासून औषधांची कमतरता आहे. याच कारणामुळे रुग्णांना उपचाराविनाच परत पाठविले जात होते. रुग्णांनी गोंधळ घालताच प्रशासनाने संपलेले इंजेक्शन मागविले आणि प्रकरण निवळले.
मेयोतील डायलिसिस सेंटर सुरुवातीपासून चर्चेत आहे. मागील काही दिवसांपूर्वी अधिष्ठाता डॉ. अनुराधा श्रीखंडे यांनी स्वत: सेंटर बंद करण्याबाबत प्रशासनाला पत्र लिहिले होते. पाण्याची टंचाई आणि इतर समस्यांमुळे रुग्णांना बराच त्रास सहन करावा लागत आहे. सेंटरमध्ये येणाऱ्या रुग्णांना ‘हेपारिल’ नावाचे इंजेक्शन दिले जाते. परंतु, इंजेक्शन काल गुरुवारला संपले. याच कारणामुळे रुग्णांना परत पाठविण्यात आले. आज शुक्रवारी सकाळी रुग्णांची गर्दी झाली. मात्र, इंजेक्शन नसल्याचे सांगण्यात आले. यावरून रुग्णांनी चांगलाच गोंधळ घातला. रुग्णांनी जोरजोरात नारेबाजीसुद्धा केली. गोंधळ वाढत असल्याचे पाहून प्रशासनाने ताबडतोब इंजेक्शन मागविले. त्यानंतर रुग्णांवर उपचार सुरू झाला.
कर्मचाऱ्यांचाही गोंधळ
मेयोमध्ये सर्जिकल कॉम्प्लेक्सच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. परंतु, कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. मागील काही दिवसांमध्ये न्यायालयात हा मुद्दा चर्चेत आला. जवळपास ७० कर्मचाऱ्यांची गरज आहे. सध्या जेवढ्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली, ते सर्व क्रिस्टल कंपनीतून आऊटसोर्स करण्यात आले आहे. ८० कर्मचारी वेगवेगळ्या पाळ्यांमध्ये कार्यरत आहेत. पण, वेतनाच्या मागणीला घेऊन सकाळच्या पाळीतील कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केले. वेतन वाढविण्याच्या मागणीला घेऊन केलेल्या आंदोलनामुळे स्वच्छतेसह इतर कामे ठप्प पडली. वॉर्डापासून ते ओपीडीतील रुग्णांना बराच त्रास सहन करावा लागला. सकाळी ८.३० वाजेपासून शस्त्रक्रियागृहामध्येही गोंधळ पाहायला मिळाला. त्यानंतर कर्मचाऱ्यांची बैठक झाली आणि प्रकरण शांत झाले.