डायलिसिसच्या रुग्णांनो काळजी घ्या : नेफ्रोलॉजी सोसायटीचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2020 12:08 AM2020-03-20T00:08:10+5:302020-03-20T00:08:43+5:30

नियमित डायलिसिस व वाढत्या वयामुळे रोगप्रतिकारशक्ती कमी झालेली असते. कोरोना विषाणू संक्रमणाचा अधिक धोका असतो. यामुळे डायलिसिसवर असलेल्या रुग्णांनी अधिक काळजी घ्यावी, असे आवाहन नेफ्रोलॉजी सोसायटीद्वारे करण्यात आले आहे.

Dialysis Patients should take care: Appeal to the Nephrology Society | डायलिसिसच्या रुग्णांनो काळजी घ्या : नेफ्रोलॉजी सोसायटीचे आवाहन

डायलिसिसच्या रुग्णांनो काळजी घ्या : नेफ्रोलॉजी सोसायटीचे आवाहन

googlenewsNext
ठळक मुद्देकोरोना संक्रमणाचा धोका : -वुहानमध्ये डायलिसिसवर असलेले १६ टक्के रुग्ण बाधित

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : उपराजधानीतील विविध केंद्रांमध्ये ६०० हून अधिक रुग्ण डायलिसिस करवून घेत आहेत. यातील बहुसंख्य रुग्णांचे वयोमान सुमारे ५० वर्षांवरील आहे. नियमित डायलिसिस व वाढत्या वयामुळे रोगप्रतिकारशक्ती कमी झालेली असते. कोरोना विषाणू संक्रमणाचा अधिक धोका असतो. यामुळे डायलिसिसवर असलेल्या रुग्णांनी अधिक काळजी घ्यावी, असे आवाहन नेफ्रोलॉजी सोसायटीद्वारे करण्यात आले आहे.
चीनच्या वुहान शहरामध्ये एकूण डायलिसिसवर असलेल्या रुग्णांपैकी १६ टक्के रुग्णांना कोरोनाची बाधा झाली होती. डायलिसिसवर असलेल्या कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्युदर हा १५ ते १६ टक्के म्हणजे सामान्य रुग्णांहून तिप्पट अधिक होता. त्यामुळे अशा रुग्णांना कोरोनाचा प्रादुर्भाव झाला तर मृत्यूचा धोका तिप्पट असतो, असे आतापर्यंतच्या आकडेवारीवरून दिसून येते, असेही सोसायटीचे म्हणणे आहे.
कोरोना विषाणूबाधितांना तात्पुरते मूत्रपिंड होण्याचा धोका
सामान्य नागरिकांमध्ये कोरोना विषाणूमुळे तात्पुरते मूत्रपिंड निकामे होण्याचे प्रमाण ५ ते १५ टक्के आहे. पूर्णत: मूत्रपिंड निकामी झाले तर मृत्युदर हा ६० ते ९० टक्क्यांपर्यंत जातो. शिवाय ३४ टक्के लोकांना लघवीतून प्रोटिन जाणे सुरू होते आणि २६ टक्के लोकांना लघवीमधून रक्ताच्या पेशी जाणे सुरू होते. अशा सगळ्या परिस्थितीत मूत्रपिंडाची काळजी घेणे अत्यावश्यक आहे.
प्रत्यारोपणामुळे रोगप्रतिकारशक्ती कमी झालेली असते
सोसायटीने असेही म्हटले आहे की, मूत्रपिंड प्रत्यारोपण करताना प्रत्यारोपित मूत्रपिंडाचा शरीराने स्वीकार करावा म्हणून औषधी घेऊन रोगप्रतिकारकशक्ती जाणीवपूर्वक कमी केली जाते. अशा वेळी रुग्णाला कोरोनाचा धोका अधिक असू शकतो. सध्या नागपुरात महिन्याकाठी पाच ते सहा मूत्रपिंड प्रत्यारोपण होत आहेत. मात्र, कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेता, मूत्रपिंड प्रत्यारोपण पुढे ढकलणे योग्य ठरेल, अशा मार्गदर्शक सूचना ‘युरोपियन आणि इटालियन’ संघटनाकडून आली आहे.

कुटुंबातील सदस्यांनीदेखील काळजी घ्यावी : डॉ. उखळकर 
नेफ्रोलॉजिस्ट डॉ. धनंजय उखळकर म्हणाले, डायलिसिस अथवा मूत्रपिंड प्रत्यारोपित रुग्ण असलेल्या कुटुंबातील सदस्यांनी अधिक काळजी घ्यायला हवी. या रुग्णांना संक्रमणाचा अधिक धोका असल्याने त्यांना प्रादुर्भाव होण्यासाठी परिवारातील सदस्य कारणीभूत ठरू शकतात. त्यामुळे किडनी प्रत्यारोपण व डायलिसिस रुग्णांच्या कुटुंबातील प्रत्येकाने अधिक काळजी घेणे क्रमप्राप्त आहे.

मूत्रपिंड प्रत्यारोपण समोर ढकलावे : डॉ. खांडेकर 
नेफ्रोलॉजी सोसायटीचे अध्यक्ष डॉ. आश्विनकुमार खांडेकर म्हणाले, मूत्रपिंड प्रत्यारोपण प्रक्रियेमध्ये रुग्णाची औषधांद्वारे प्रतिकारशक्ती कमी केली जाते. यामुळे अशा रुग्णांना कोरोना विषाणूचा धोका अधिक असतो, अशावेळी जे येत्या काही दिवसात प्रत्यारोपण करवून घेणार आहेत, ते पुढे ढकलणे योग्य राहील.

रुग्णांनी अशी घ्यावी काळजी

  •   सार्वजनिक वाहतुकीचा वापर टाळा
  •  गर्दी ठिकाणी जाऊ नये
  •  दुसऱ्या व्यक्तीपासून सहा फुटाचे अंतर ठेवावे
  •  डायलिसिसवरील वयस्क रुग्णाने नातवांशी खेळणे टाळावे
  •  ताप असेल तर डॉक्टरांना सुचित करावे
  •  घरात औषधांचा साठा करून ठेवावा
  •  कोरोनाग्रस्तांशी संपर्क आला तर सूचना द्यावी.

Web Title: Dialysis Patients should take care: Appeal to the Nephrology Society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.