इलेक्शन स्पेशलच्या ३५ प्रवाशांना अतिसार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 11:49 PM2019-05-22T23:49:08+5:302019-05-22T23:50:16+5:30
नागपूर रेल्वेस्थानकावर आलेल्या इलेक्शन स्पेशलच्या प्रवाशांना अतिसाराची लागण झाली. जवळपास ३५ प्रवासी आजारी पडल्याने रेल्वे कर्मचाऱ्यांची चांगलीच धावपळ झाली. रेल्वे डॉक्टरानी त्यांच्यावर उपचार केले. स्टेशन उपव्यवस्थापक आणि रेल्वे कर्मचाऱ्यांनी मदत केली. तासाभरानंतर ही गाडी पुढील प्रवासाला निघाली. ही घटना बुधवारी सकाळी ११.१८ वाजता नागपूर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक २ वर घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर रेल्वेस्थानकावर आलेल्या इलेक्शन स्पेशलच्या प्रवाशांना अतिसाराची लागण झाली. जवळपास ३५ प्रवासी आजारी पडल्याने रेल्वे कर्मचाऱ्यांची चांगलीच धावपळ झाली. रेल्वे डॉक्टरानी त्यांच्यावर उपचार केले. स्टेशन उपव्यवस्थापक आणि रेल्वे कर्मचाऱ्यांनी मदत केली. तासाभरानंतर ही गाडी पुढील प्रवासाला निघाली. ही घटना बुधवारी सकाळी ११.१८ वाजता नागपूर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक २ वर घडली.
००७९५ इलेक्शन स्पेशल ही गाडी तरणतारण, पंजाब येथून निघाली. ही गाडी केरळला जात होती. लांब पल्ल्याचा प्रवास असल्यानंतरही या गाडीत पेंट्रीकारची व्यवस्था नव्हती. त्यामुळे जेवण आणि पाण्यासाठी प्रवाशांची चांगलीच फजिती झाली. ठिकठिकाणचे पाणी आणि जेवण घेतल्यामुळे काही प्रवाशांना मध्यरात्रीपासून उलट्या आणि अतिसाराचा त्रास सुरू झाला. ही गाडी आज सकाळी ११.१८ वाजताच्या सुमारास नागपूर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक २ वर आली. घटनेची माहिती उपस्टेशन व्यवस्थापकांना देण्यात आली. उपस्टेशन व्यवस्थापक अतुल श्रीवास्तव यांनी लगेच रेल्वे डॉक्टरांना सूचना दिली. त्यापूर्वी श्रीवास्तव आणि इतर कर्मचारी प्लॅटफार्मवर पोहोचले. रेल्वे डॉक्टर आणि परिचारिकाही आल्या. त्यांनी आजारी प्रवाशांवर औषधोपचार केले. ३५ प्रवाशांवर उपचार केल्यानंतर ही गाडी दुपारी १२.३० वाजता पुढील प्रवासासाठी रवाना झाली.