अतिसार नियंत्रण पंधरवडा अपुऱ्या औषधांवर
By admin | Published: July 30, 2014 01:13 AM2014-07-30T01:13:19+5:302014-07-30T01:13:19+5:30
राज्य शासनाच्या आरोग्य सेवा विभागाकडून अतिसार नियंत्रण पंधरवडा राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहे. प्रत्यक्षात औषधींचा पुरवठा झालेला नाही. केवळ आठवडाभर पुरेल येवढाच औषधीसाठा आरोग्य विभागाजवळ आहे.
केवळ सोपस्कार : झिंक टॅबलेट, ओआरएसचा आठवड्याभराचा साठा
सुरेंद्र राऊत - यवतमाळ
राज्य शासनाच्या आरोग्य सेवा विभागाकडून अतिसार नियंत्रण पंधरवडा राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहे. प्रत्यक्षात औषधींचा पुरवठा झालेला नाही. केवळ आठवडाभर पुरेल येवढाच औषधीसाठा आरोग्य विभागाजवळ आहे. या स्थितीत मडकोना येथे अतिसार नियंत्रण पंधरवाड्याची सुरूवात करण्यात आली.
निवडणुकीच्या तोंडावर आरोग्य विभागाची उपलब्धी दाखविण्याची धडपड सुरू आहे. त्यामुळे औषधीसाठा नसताना अतिसार नियंत्रण पंधरवाडा राबविण्यात येत आहे. यवतमाळ जिल्हा परिषद आरोग्य विभागाने राज्य शासनाकडे जानेवारी महिन्यात ओआरएस आणि झिंक टॅबलेटची मागणी केली होती. मात्र अद्यापही औषधीचा पुरवठा झाला नाही. जिल्हा परिषद आरोग्य विभागाने त्यांच्या स्तरावर खरेदी केलेली औषधी आहे. आणीबाणीच्या स्थितीसाठी हा साठा आरक्षित करण्यात येतो. मात्र विशेष कार्यक्रम आल्याने त्याचाच वापर केला जात आहे. जिल्ह्यात एक लाख ओआरएस पाकीट, झिंक टॅबलेटचे पाच लाख पाकीट उपलब्ध आहेत. अतिसार नियंत्रण पंधरवड्यासाठी ३२ लाख ओआरएस पाकीट आणि ३७ लाख झिंक टॅबलेट पाकीटची आवश्यकता आहे. हा औषधीसाठा शासनस्तरावरून पुरविण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. शून्य ते पाच वयोगाटातील अतिसार झालेल्या बालकांना हे औषध देण्यात येणार आहे. याची जबाबदारी आशा स्वयंसेविकांवर सोपविण्यात आली आहे. हे औषध वितरण करण्यासाठी एक रुपया प्रती पाकीट याप्रमाणे मानधन देण्यात येणार आहे. यावर आशा स्वयंसेविकांनी यापूर्वीच बहिष्कार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे ही औषधी लाभार्थ्यांची घरी पोहोचणार की, नाही अशी शंका उपस्थित केली जात आहे. सध्यातरी हा पंधरवाडा अंधातरीच असल्याचे दिसून येते. केवळ लादलेला कार्यक्रम राबवायाचा म्हणून यंत्रणा कामाला लावण्यात आली आहे.