जगभरातील हुकुमशाहांनी लाेकशाहीला खेळणे बनविले-श्रीपाल सबनीस
By निशांत वानखेडे | Published: March 31, 2024 07:04 PM2024-03-31T19:04:45+5:302024-03-31T19:05:15+5:30
जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाच्या पुरस्कारांचे वितरण
नागपूर : रशिया किंवा दक्षिण काेरिया या देशात लाेकशाहीच्या नावाने हुकुमशाही सुरू आहे. आपला भारतही त्या टप्प्यावर पाेहचला आहे. देशातील राजकीय व्यवस्था कधी नव्हे इतकी क्रुर झाली आहे. देशात लाेकशाही उरलेलीच नाही. हुकुमशाहांनी लाेकशाहीला खेळणे बनविले आहे, असे परखड मत अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक डाॅ. श्रीपाल सबनीस यांनी केली.
जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळातर्फे देण्यात येणाऱ्या पुरस्कारांचे रविवारी वितरण करण्यात आले. हिंदी माेरभवन येथे झालेल्या कार्यक्रमात मिलिंद महाविद्यालय, छ. संभाजीनगरच्या प्राचार्या डाॅ. वैशाली प्रधान, महामंडळाचे अध्यक्ष डॉ. दीपककुमार खोब्रागडे, नाटककार डॉ. सुनील रामटेके, कादंबरीकार डॉ. विद्याधर बनसोड, महामंडळाचे सचिव डॉ. रवींद्र तिरपुडे, उपाध्यक्ष डॉ. विलास तायडे, कायदेविषयक सल्लागार अॅड. भूपेश पाटील यांची उपस्थिती होती.
या पुरस्कारांमध्ये ज्येष्ठ साहित्यिक डाॅ. धनराज डहाट, अनिल मनाेहर आणि डाॅ. बी. रंगराव यांना डाॅ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय जीवनगाैरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याशिवाय डाॅ. जगन कराडे, काेल्हापूर व डाॅ. प्रकाश करमाडकर, पुणे यांना डाॅ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय आदर्शन शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात येईल. डाॅ. तृप्ती साेनवणे, ठाणे यांना सावित्रीबाई फुले आदर्श महिला पुरस्कार, डाॅ. सुनील रामटेके यांच्या महासूर्य नाटकाकरिता क्रांतिसूर्य जोतीराव फुले राष्ट्रीय पुरस्कार, डाॅ. अशाेक पळवेकर यांच्या असहमतीचे रंग या काव्यसंग्रहासाठी नामदेव ढसाळ राष्ट्रीय पुरस्कार, डाॅ. विद्याधर बन्साेड यांच्या ‘माेनास पत्र’ या पत्रसंग्रहास रमाबाई आंबेडकर राज्यस्तरीय पुरस्कार, सुजाता लाेखंडे यांच्या ‘सागर तळाशी’ या ललित संग्रहास डाॅ. गंगाधर पानतावणे राज्यस्तरीय पुरस्कार, डाॅ. देवीदास तारू यांच्या ‘आता मव्ह काय’ या आत्मचरित्रास दया पवार राज्यस्तरीय पुरस्कार तर डाॅ. अशाेक काळे यांच्या ‘अपहरण’ कादंबरीस बाबूराव बागूल राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
तसेच ४० लेखकांच्या उत्कृष्ट कलाकृतींना पुरस्कार व विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या ५० व्यक्तींना गाैरविण्यातआले.डाॅ. सबनीस म्हणाले, आता देशात पूर्वीचे हिंदूत्व राहिले नाही तर गाेडसेच्या वळणावर चालणारे हिंस्त्र हिंदूत्व आले आहे. सत्य आधारित संस्कृतीऐवजी आक्रमक झुंडी तयार हाेत आहेत. ईश्वर मानणे किंवा निरीश्वरवादी असणे, यापेक्षा मानवतावादी असणे अधिक महत्त्वाचे आहे. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कुठल्या धर्माचा टीळा लावून संविधान लिहिले नाही. भारतीय संविधान धर्मनिरपेक्ष आहे. त्यामुळे धार्मिक संस्कृती की संविधानिक संस्कृती पाहिजे याचा विचार करावा लागेल. त्यामुळे कडव्या हिंदूत्ववादाचे आव्हान थाेपविण्यासाठी नवा आंबेडकरवाद पेरण्याची गरज असून साहित्यिकांनी दु:खमुक्त मानवतेचे ध्येय ठेवून लेखन करावे, असे आवाहन डाॅ. सबनीस यांनी केले. डाॅ. खाेब्रागडे यांनी डाॅ. आंबेडकर यांच्या वैश्विक कार्याला अधिक व्यापक बनविण्यासाठी महामंडळ कार्य करीत असल्याचे सांगितले.