मधुमेहाने ‘ त्यांच्या’ समोर कां गुडघे टेकले ? जाणून घ्या कारणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2018 02:37 PM2018-05-07T14:37:37+5:302018-05-07T14:38:12+5:30
वयाची ८५ गाठली तरी त्यांचे मधुमेहावर नियंत्रण कायम आहे. मधुमेहाशी या लढ्याने वैद्यकीय क्षेत्रही चकीत आहे. या प्रतिकाराचा आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वर्ण पदकाने त्यांचा सन्मानही करण्यात आला आहे. जगातील दुर्मिळातील दुर्मिळ प्रकरण म्हणून त्याकडे पाहिले जात आहे.
सुमेध वाघमारे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रथम प्रकारच्या मधुमेही रुग्णांना दररोज इंजेक्शनद्वारे इन्सुलिन घ्यावे लागते. त्याशिवाय शरीरातील ग्लुकोजचा वापर होत नाही. त्याच्या जोडीला नियमित व्यायाम, योग्य आहार व वेळेवर इन्सुलिन घेणे आवश्यक असते. परंतु सलग ६८ वर्षे अशी जीवनशैली अंगिकारणे कठीणच. मात्र हिराचंद सवाने यांनी ते करून दाखविले. वयाची ८५ गाठली तरी त्यांचे मधुमेहावर नियंत्रण कायम आहे. मधुमेहाशी या लढ्याने वैद्यकीय क्षेत्रही चकीत आहे. या प्रतिकाराचा आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वर्ण पदकाने त्यांचा सन्मानही करण्यात आला आहे. जगातील दुर्मिळातील दुर्मिळ प्रकरण म्हणून त्याकडे पाहिले जात आहे.
हिराचंद महादेवराव सवाने त्यांचे पूर्ण नाव. वयाच्या १३ व्या वर्षी नागपूरच्या व्यायामशाळेतील रोमन रिंग खेळत असताना अचानक पडले. पाठीच्या कण्याला गंभीर जखम झाली. ‘कॉम्प्रेशन फ्रॅक्चर’ झाले. गळ्यापासून ते कंबरेपर्यंत प्लॅस्टर लागले. या अवस्थेत सहा महिने राहिले. यामुळे शरीरात इन्सुलिन तयार करणारे ‘पॅनक्रियाज’ निकामी झाले. तो काळ होता १९४७ चा. त्यावेळी मेडिकल नव्हते. आई-वडिलांच्या सांगण्यावरून आयुर्वेििदक, होमिओपॅथिक, पुण्याची संजीवन पॅथी व नॅचरोपॅथीचा उपचार घेतले. परंतु या सर्व उपचारानंतर शारीरिक प्रकृती खालवली, नंतर पुन्हा अॅलोपॅथिक उपचाराकडे वळले. इन्सुलिन घेणे सुरू केले. मेयो रुग्णालयाच्या उपचारानंतर नुकतेच स्थापन झालेल्या मेडिकलमध्ये भरती झाले. भरती असताना सवाने यांनी मधुमेहाबद्दलची माहिती व पॅथालॉजिकल अभ्यास केला. दररोज ४० रुग्णांची लघवीची तपासणी करण्याची जबाबदारी डॉक्टरांनी त्यांच्याकडे दिली होती. भरती असतानाही ते नित्यनेमाने पाच कि.मी. फिरायला जायचे. त्यावेळी रोज २०० युनिटस् इन्सुलिन सकाळी व २०० युनिटस् सायंकाळी इंजेक्शनही घेत. यादरम्यान आहार अतिप्रमाणात वाढला होता. त्यामुळे डॉक्टरांच्या मदतीने दर दीड तासाला साखर तपासून पाहणे सुरू केले. काय खाल्ले म्हणजे साखर वाढते, याचे निरीक्षण करू लागले. त्यानुसार खाण्यात बदल करीत गेले. यामुळे इन्सुलिनचा डोज कमी झाला.
१९५२ ते १९५६ दरम्यान त्यांनी योग्य दिनचर्या व आहाराच्या मदतीने मधुमेहाला नियंत्रणात आणले. आज वयाच्या ८५ व्या वर्षीसुद्धा रोज सकाळी पाच किलोमीटर चालतात, शरीरातील साखरेचे प्रमाण स्वत:च तपासतात. इन्सुलिन घेण्याचा वेळाही चुकवीत नाही. त्यांचा एकच सल्ला आहे आळस करू नका, सक्रिय राहा, योग्य आहार घ्या, आनंदी राहा.
घरातील मंडळीची साथ
१९५५ पासून सवाने यांनी मनपाच्या स्थापत्य विभागात नोकरीला सुरुवात केली. १९९३ मध्ये मनपाचे बजेट आॅफिसर म्हणून निवृत्त झाले. त्यांना दोन मुले आणि दोन मुली आहेत. वयाची ८५ गाठली तरी त्यांचे सर्व अवयव चांगले आहेत. महत्त्वाचे म्हणजे, त्यांच्या या आजारात घरच्या मंडळीची मोठी साथ मिळाली. विशेषत: त्यांच्या पत्नी मंदा यांची. रात्री-बेरात्री जागे राहून त्यांनी त्यांच्या तब्येतीची काळजी घेतली.
अशी आहे दिनचर्या
सवाने यांनी सांगितले, सकाळी ७ वाजता उठतो. एक कप दूध घेतल्यांतर पाच किलोमीटर फिरायला जातो. सकाळी ९ वाजता इन्सुलिनचा पहिला डोज घेतो. त्यानंतर ५० ग्रॅम कणकेचे दोन फुलके, एक वाटी वरण, एक वाटी भाजी व सलाद असा आहार घेतो. जेवणात पालेभाज्या, शेंगा यांचे प्रमाण जास्त ठेवतो. अडीच तासानंतर कुठलेही अर्धे फळ खातो. दुपारी १ वाजता पुन्हा इन्सुलिनचा डोज घेतो. पुन्हा त्याच पद्धतीचा आहार. दुपारी ४ वाजता एक वाटी उपमा किंवा पोहे आणि विनासाखरेची अर्धाकप कॉफी घेतो. सायंकाळी फिरायला जातो. रात्री ९ वाजता पुन्हा इन्सुलिनचा डोज घेऊन त्याच पद्धतीचा आहार घेतो. यावेळी जेवणात एक वाटी भात किंवा खिचडी असते. रात्री ११ वाजता पुन्हा इन्सुलिनचा डोज घेतो. यादरम्यान प्रत्येक डोज घेण्यापूर्वी शरीराच्या साखरेचे प्रमाण तपासून त्याची नोंद नोटबुकवर लिहून ठेवतो. हे गेल्या १९८५ पासून अविरत सुरू आहे.
ही ‘रेअर केस’
सवाने यांच्यावर उपचार करणारे प्रसिद्ध मधुमेह तज्ज्ञ डॉ. शरद पेंडसे म्हणाले, तब्बल ६८ वर्षे मधुमेहाशी लढा देणारे हिराचंद सवाने हे जगातील ‘रेअर केस’ म्हणजे दुर्मिळातील दुर्मिळ प्रकरण असावे. नियमित व्यायाम, योग्य आहार, वेळेत औषधी घेऊन सक्रिय जीवनशैली आत्मसात केल्यास मधुमेहावर नियंत्रण ठेवणे शक्य आहे, याचे हे जिवंत उदाहरण आहे.
स्वर्ण पदकाने लढ्याचा सन्मान
४सवाने यांनी सांगितले, १५ जानेवारी १९९५ मध्ये सलग ४७ वर्षांपर्यंत ३६,२३३ इन्सुलिन इंजेक्शन घेऊन मधुमेहाशी लढत दिल्याबद्दल आंतरराष्टÑीयस्तरावर प्रसिद्ध असलेल्या डॉक्टरांनी स्वर्ण पदक देऊन सन्मानित केले. इंटरनॅशनल डायबेटिक असोसिएशनचे सदस्य व स्कॉटहोम स्वीडनचे प्रसिद्ध डॉ. येकले मार्क, अमेरिकेच्या मिशीगन विद्यापीठाचे डॉ. व्ही. मोसीन व डॉ. नलिनी यावेळी उपस्थित होते.
ही ‘रेअर केस’
सवाने यांच्यावर उपचार करणारे प्रसिद्ध मधुमेह तज्ज्ञ डॉ. शरद पेंडसे म्हणाले, तब्बल ६८ वर्षे मधुमेहाशी लढा देणारे हिराचंद सवाने हे जगातील ‘रेअर केस’ म्हणजे दुर्मिळातील दुर्मिळ प्रकरण असावे. नियमित व्यायाम, योग्य आहार, वेळेत औषधी घेऊन सक्रिय जीवनशैली आत्मसात केल्यास मधुमेहावर नियंत्रण ठेवणे शक्य आहे, याचे हे जिवंत उदाहरण आहे.