ब्राह्मोसच्या भविष्यातील घडामोडींचाही डाटा झाला लिक?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 10:30 AM2018-10-12T10:30:48+5:302018-10-12T10:32:52+5:30
निशांत अग्रवाल आणि त्याच्या साथीदारांनी ब्राह्मोसच्या केवळ विद्यमान नव्हे तर भविष्यातील वेधाचेही तंत्रज्ञान लिक केल्याचा संशयवजा अंदाज तपास यंत्रणांकडून काढण्यात आला आहे.
नरेश डोंगरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : निशांत अग्रवाल आणि त्याच्या साथीदारांनी ब्राह्मोसच्या केवळ विद्यमान नव्हे तर भविष्यातील वेधाचेही तंत्रज्ञान लिक केल्याचा संशयवजा अंदाज तपास यंत्रणांकडून काढण्यात आला आहे. निशांत आणि त्याच्या साथीदारांनी ११ मार्च २०१७ ते आॅक्टोबर २०१८ पर्यंतचा एकत्रित डाटाही तयार करण्यात आला असावा, असा संशय असल्याचे खास सूत्रांचे सांगणे आहे.
ब्राह्मोस सुपरसोनिक क्रूज मिसाईलचे ११ मार्च २०१७ ला सकाळी ११ वाजून ३३ मिनिटांनी यशस्वी परीक्षण करण्यात आले होते. त्यातून बनविण्यात आलेल्या अहवाला(रिपोर्ट)चे मुद्दे एकत्रित करून २७ मार्चला एक रिपोर्ट तयार करण्यात आला. तो निशांत तसेच त्याच्या साथीदारांनी वेगवेगळ्या स्वरूपात पाकिस्तानी गुप्तचर संघटना आयएसआयकडे सोपविण्यात आला होता. निशांतने त्याचेच प्रेझेन्टेशन प्रारंभी दिले होते, असा संशय आहे. नंतर मात्र आयएसआयच्या हस्तकांकडून मिळालेल्या सूचना-मागणीनुसार वेगवेगळी महत्त्वपूर्ण माहिती तिकडे पाठविण्यात आल्याचा अंदाज तपास यंत्रणांनी आतापर्यंतच्या तपासातून काढला असल्याचे सांगितले जाते.
यासंदर्भात बोलताना दुसऱ्या एका वरिष्ठ सूत्रांच्या माहितीनुसार, बीएसएफचा जवान अच्युतानंद मिश्राला तपास यंत्रणांनी दोन आठवड्यांपूर्वी अटक केली होती. त्याच्या चौकशीतून डिफेन्स मटेरियल आणि स्टोर्स रिसर्च डिपार्टमेंटशी संबंधित कानपुरातील दोघांची नावे अधोरेखित झाली. त्यांना ताब्यात घेऊन केलेल्या चौकशीनंतर सोमवारी निशांत अग्रवालकडे छापा मारून त्याच्या मुसक्या बांधण्यात आल्या. आता पुन्हा रफिकुल नामक एक व्यक्ती तपास यंत्रणेच्या हाती लागला. त्याच्याकडून डीआरडीओशी संबंधित माहितीची एक किट हाती लागली. त्यात विद्यमान ब्राह्मोस आणि दोन वर्षानंतर लॉन्च करण्याची तयारी सुरू असलेल्या ब्रह्मोस-२ मिसाईलच्या संबंधाने काही सांकेतिक माहिती असल्याचे सांगितले जाते. त्यावरून निशांत आणि त्याच्या साथीदारांनी शत्रू राष्ट्रांच्या गुप्तचर संघटनांना भारताच्या सुरक्षेचे कवच पोखरल्यासारखे केले असल्याचा अतिगंभीर प्रकार पुढे आल्याचे अधिकारी म्हणतो.
दोन नद्या, दोन देश आणि दोन शत्रू
भारताची ब्रह्मपुत्रा आणि रशियाची मोस्कवा या दोन नद्यांची नावे एकत्रित करून ब्राह्मोस हे नाव मिसाईलला देण्यात आले होते. ब्राह्मोस भारताच्या संरक्षण विभागाला बलाढ्य करणारी ठरले आहे. मात्र, पारंपरिक शत्रू पाकिस्तान आणि अमेरिकाने ब्राह्मोसचे तंत्रज्ञान माहीत करून घेण्यासाठी निशांतसह अनेकांना हनी ट्रॅपमध्ये फसवून डाटा लिक करून घेण्यात यश मिळवले, त्यामुळे सर्वत्र चिंता व्यक्त केली जात आहे.