हॉटेल कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाले का भाऊ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:09 AM2021-08-19T04:09:48+5:302021-08-19T04:09:48+5:30
नागपूर : अनलॉकमध्ये हॉटेल्स व रेस्टॉरंट दुपारी चारपर्यंतच सुरू होते; पण नागपुरात कोरोना रुग्णांची संख्या शून्य टक्क्यांवर आल्यानंतर राज्य ...
नागपूर : अनलॉकमध्ये हॉटेल्स व रेस्टॉरंट दुपारी चारपर्यंतच सुरू होते; पण नागपुरात कोरोना रुग्णांची संख्या शून्य टक्क्यांवर आल्यानंतर राज्य सरकारच्या आदेशानुसार नागपूर मनपा प्रशासनाने हॉटेल्स व रेस्टॉरंट १६ ऑगस्टपासून रात्री १० पर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी दिली आणि लसींचे दोन डोस घेतलेल्यांना काम करणे सक्तीचे केले; पण हॉटेल्स व रेस्टॉरंटमधील कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.
प्राप्त आकडेवारीनुसार नागपूर शहरात जवळपास ४१९७ लहानमोठे हॉटेल्स, लॉज, खानावळ आणि रेस्टॉरंट आहेत. याशिवाय फुटपाथवर अस्थायी रेस्टॉरंट चालविणाऱ्यांची संख्या दीड हजारांपेक्षा जास्त आहेत. या व्यवसायात ४० हजारांपेक्षा जास्त कर्मचारी कार्यरत आहेत. मनपाचे अधिकारी दोन डोस व १४ दिवस पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांची तपासणी करीत आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई होत आहे. जवळपास ६० टक्क्यांपेक्षा जास्त लोक १८ ते ४५ वयोगटातील आहेत. राज्य सरकारने १ मेपासून लसीकरण सुरू केले. रेस्टॉरंट अनेक दिवस बंद असल्याने लसीकरण कुणाचे झाले, हे कळले नाही; पण १६ ऑगस्टपासून रात्री १० पर्यंत हा व्यवसाय सुरू ठेवण्याची परवानगी मिळाल्याने कर्मचारी, वेटर, आदींना कामावर बोलाविले आहे. कारवाईच्या भीतीपोटी ज्यांचे दोन डोस व १४ दिवस पूर्ण झाले नाहीत, अशांना येण्यास मनाई केली आहे. या अटीमुळे १० पैकी केवळ ३ कर्मचारी कामावर आहेत. राज्य सरकारने ही अट शिथिल करावी.
काहींचे लसीकरण पूर्ण, काहींचे बाकी !
धंतोली येथील एका हॉटेलमधील कर्मचाऱ्याला विचारण केली असता त्याने दोन डोस घेतल्याचे सांगितले. वय ४९ असल्याने दोन्ही डोस घेणे शक्य झाल्याचे तो म्हणाला. दोन्ही डोस महिन्यापूर्वीच घेतले आहेत. त्यामुळे रोजगार मिळाला आहे. कोरोना काळात हॉटेल बंद असल्याने रोजगार नव्हता.
रामदासपेठेतील एका हॉटेलची तपासणी केली असता तीन कर्मचाऱ्यांनी एक डोस घेतल्याचे दिसून आले. रोजगारासाठी कामावर आलो. कारवाईसाठी कुणी आल्यास हॉटेलबाहेर जावे लागेल, असे मालकाने आधीच सांगितले आहे. नियमानुसार दुसरा डोस लवकरच घेणार आहे. दुसरा डोस घेतलेला कर्मचारी कामावर राहणार नाही, तर हॉटेल चालणार कसे, हासुद्धा प्रश्न आहे.
रस्त्यांवरील टपऱ्यांवर आनंदीआनंद
इतवारी व महाल येथील रस्त्यावरील चहाच्या टपऱ्यांची पाहणी केली असता एका टपरीवर मालकाने आणि कर्मचाऱ्याने एकच डोस घेतल्याचे दिसून आले. या टपरीवर सर्वजण ४० वयोगटाच्या आतील होते. दुसरा डोस लवकरच घेऊ, असे मालक व कर्मचारी म्हणाले.
लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर जुलै महिन्यात हॉटेल व्यवसाय सुरू झाला. या व्यवसायात काम करणारे कर्मचारी बहुतांश १८ ते ४५ वयोगटातील आहे. व्यवसायातील बहुतांश कर्मचाऱ्यांचा लसींचा पहिला डोस झाला आहे. दुसऱ्या डोससाठी ८४ दिवसांच्या कालावधीचा नियम असल्याने ८० टक्के कर्मचाऱ्यांचा दुसरा डोस अजूनही झाला नाही. एक डोस घेतलेल्यांना सूट द्यावी, अशी मागणी आहे.
तेजिंदरसिंग रेणू, अध्यक्ष, नागपूर रेसिडेन्सियल हॉटेल असोसिएशन.
रेस्टॉरंट, बेकरीमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांपैकी ५० टक्क्यांपेक्षा जास्त जणांचे दोन डोस पूर्ण झाले आहेत. कोविशिल्ड घेण्यासाठी ८४ दिवसांचा कालावधी आहे. त्यानंतर १४ दिवस पूर्ण करायचे आहे. राज्य सरकारने १ मेपासून लसीकरण सुरू केले. प्रारंभी सरकारने लस उपलब्ध केली नाही. एकीकडे रेस्टॉरंटही चालवायचे आहे, तर दुसरीकडे सरकारच्या आदेशाचे पालन करायचे आहे. एक डोस घेतलेल्यांना कामाची परवानगी द्यावी.
अमित बाम्बी, अध्यक्ष, नागपूर ईटरी ओनर्स असोसिएशन.
- शहरातील हॉटेल्स व रेस्टॉरंट - ४१९७
- सध्या सुरू झालेले हॉटेल्स व रेस्टॉरंट - ३७३६
- हॉटेल कर्मचाऱ्यांची संख्या - ४० हजारांपेक्षा जास्त