मिश्रांच्या गुणपत्रिका ‘बोगस’ होत्या का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 11:35 PM2018-04-11T23:35:12+5:302018-04-11T23:35:24+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी नागपूर विद्यापीठाच्या जनसंवाद अभ्यासमंडळाचे माजी अध्यक्ष सुनील मिश्रा यांच्या ‘एलएलबी’च्या गुणपत्रिका ‘बोगस’ होत्या का, असा नागपूर विद्यापीठ प्रशासनाला संशय आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी नागपूर विद्यापीठाच्या जनसंवाद अभ्यासमंडळाचे माजी अध्यक्ष सुनील मिश्रा यांच्या ‘एलएलबी’च्या गुणपत्रिका ‘बोगस’ होत्या का, असा नागपूर विद्यापीठ प्रशासनाला संशय आहे. यासंदर्भात कुलगुरूंनी अहवाल मागविला असून, परीक्षा विभागाला तीन ते चार दिवसांत हा अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. २००६ साली परीक्षा मंडळाने मिश्रा यांच्या गुणपत्रिका परत घेण्याच्या व रद्दबातल ठरवीत असल्याचा निर्णय घेतला होता. मात्र या गुणपत्रिकाच ‘बोगस’ असल्याचा विद्यापीठ प्रशासनाला संशय असून त्याची चाचपणी करण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. विशेष म्हणजे डॉ.वेदप्रकाश मिश्रा यांनी गांधी विचारधाराप्रकरणी पाठविलेल्या पत्रातील संदर्भानंतर विद्यापीठाने हे पाऊल उचलले आहे.
मिश्रा यांनी १९९५ मध्ये ‘एलएलबी’ प्रथम वर्षाची परीक्षा दिली होती. ‘लॉ आॅफ टार्ट’ या विषयाच्या पेपरचे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी त्यांनी परीक्षा विभागात अर्ज केला होता. पुढे कोहचाडे प्रकरणात मिश्रा यांची चौकशी झाल्यानंतर त्यांनी प्रथम वर्ष, द्वितीय वर्ष व तृतीय वर्षाची गुणपत्रिका विद्यापीठाला परत करत असल्याचा अर्ज तत्कालीन कुलगुरू डॉ.एस.एन.पठाण यांना केला होता. १३ नोव्हेंबर २००६ च्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत हे प्रकरण ठेवण्यात आले होते व परीक्षा मंडळाने या तिन्ही गुणपत्रिका परत घेण्याच्या व त्या रद्दबातल ठरवीत असल्याचा निर्णय घेतला होता.
गांधी विचारधारा पदविकेत वाङ्मय चौर्यप्रकरणात डॉ.वेदप्रकाश मिश्रा यांनी पदविका परत घेण्यासंदर्भात विद्यापीठाला पत्र लिहिले. यात त्यांनी याअगोदरदेखील गुणपत्रिका परत घेण्याचा निर्णय झाल्याचा संदर्भ दिला. नेमक्या कोणत्या गुणपत्रिका विद्यापीठाने परत घेण्याचा निर्णय घेतला होता, याची चौकशी सुरू असताना सुनील मिश्रा यांची गुणपत्रिका बोगस असल्याचा संशय अधिकाऱ्यांना आला. त्यामुळे आम्ही त्यांच्या गुणपत्रिकांची चाचपणी करत आहे, अशी माहिती कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी दिली. यासंदर्भात तीन दिवसांत अहवाल देण्याचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.नीरज खटी यांना निर्देश देण्यात आले होते. परंतु परीक्षेचे काम सुरू असल्यामुळे हा अहवाल सादर व्हायला चार ते पाच दिवस लागतील, असे कुलगुरूंनी सांगितले.