सरकार कधी कोसळणार, हे राऊतांना आधीच माहीत होते का? 'त्या' पत्राची चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2022 10:33 AM2022-09-01T10:33:40+5:302022-09-01T10:49:18+5:30

२० जून रोजीच्या पत्रात लिहिली होती कार्यकाळ समाप्त होण्याची तारीख

Did Nitin Raut know in advance when the government would collapse? tenure expiry date was written in the letter dated 20th June | सरकार कधी कोसळणार, हे राऊतांना आधीच माहीत होते का? 'त्या' पत्राची चर्चा

सरकार कधी कोसळणार, हे राऊतांना आधीच माहीत होते का? 'त्या' पत्राची चर्चा

Next

कमल शर्मा

नागपूर : २१ जून रोजी एकनाथ शिंदे समर्थक आमदारांसह सुरतवरून गुवाहाटीला पोहोचले होते. तेव्हापर्यंत महाविकास आघाडी सरकारचे भविष्य अधांतरीच होते; परंतु तत्कालीन ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना कदाचीत अगोदरच सर्व काही कळले होते. सरकार नेमके कधी कोसळणार याची तारीखसुद्धा त्यांना माहिती होती. त्यामुळेच कदाचित त्यांनी २० जून रोजी लिहिलेल्या पत्रात त्यांचा कार्यकाळ २९ जूनपर्यंतच राहील, असे स्पष्ट केले होते. त्यामुळे सरकार कधी कोसळणार, हे नितीन राऊत यांना आधीच माहिती होते का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

३० जून रोजी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. तोपर्यंत सरकारबाबत अनिश्चिततेचे वातावरण होते. यादरम्यान नितीन राऊत यांनी आपल्या कार्यकाळात झालेल्या कामांवर ‘कॉफी टेबल बुक’ प्रकाशित करण्यासाठी २० जून रोजी ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिवांना पत्र लिहिले. या पत्रात त्यांनी सांगितले की, ६ जानेवारी २०२० रोजी त्यांनी ऊर्जामंत्री पदाचा कार्यभार स्वीकारला, तर २९ जून २०२२ रोजी मंत्रिपद समाप्त होत आहे. यादरम्यान ९०६ दिवस ते ऊर्जामंत्री राहिले.

त्यांच्या कार्यकाळात महाजेनको, महावितरण, महापारेषण, महाऊर्जा आणि मुख्य विद्युत निरीक्षक आदी कंपन्यांमध्ये आमूलाग्र सुधारणा करण्यात आली. यावर सर्व कंपन्यांनी एकत्रित माहिती तयार करायला हवी. वीज दर कमी करण्याचा दावाही त्यांनी या पत्रात केला आहे. यासंदर्भात कॉफी टेबल बुक प्रकाशित करायला हवी, असे राऊत यांनी या पत्रात स्पष्ट म्हटले आहे.

आश्चर्याची बाब म्हणजे राऊत यांनी ही सर्व माहिती २० जून रोजी लिहिली आहे. जेव्हा एकनाथ शिंदे हे २१ जून रोजी समर्थक आमदारांसह सुरतवरून गुवाहाटीला पोहोचले होते. सरकार संकटात होते; परंतु महाविकास आघाडीचे दिग्गज नेते तेव्हा सरकारला काहीही होणार नाही, असा दावा करीत होते. आता राऊत यांना सरकार २९ जूनपर्यंतच राहील, याचे ज्ञान कुठून मिळाले, हे सांगणे कठीण आहे.

राऊत यांच्या विश्वासू अधिकाऱ्याचा राजीनामा

दरम्यान नितीन राऊत यांचे विश्वासू व जवळचे मानले जाणारे महाजेनकोचे संचालक (मानव संसाधन) डॉ. मानवेंद्र रामटेके यांना राजीनामा द्यावा लागला. त्यांच्या नियुक्तीत झालेली गडबड ‘लोकमत’ने उघडकीस आणली होती. या पदासाठी मानव संसाधनमध्ये एमबीए असणे आवश्यक होते; परंतु रामटेके यांनी बिझनेस मॅनेजमेंटमध्ये एमबीए केले आहे. मानव संसाधन क्षेत्राचे त्यांना कुठलेही अनुभव नव्हते. तरीही राऊत यांच्या कार्यकाळात त्यांना महाजेनकोचे निदेशक बनवण्यात आले. ही नियुक्ती नेहमीच वादात राहिली. आता रामटेके यांना राजीनामा द्यावा लागला.

Web Title: Did Nitin Raut know in advance when the government would collapse? tenure expiry date was written in the letter dated 20th June

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.