आपल्या खाद्यपदार्थांत भेसळखोरांनी विष तर कालवले नाही ना?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:10 AM2021-08-19T04:10:18+5:302021-08-19T04:10:18+5:30
नागपूर : श्रावण महिन्यापासून सण मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. याच काळात मिठाई, उपवासाचे पदार्थ, तयार व पॅकबंद पदार्थांची ...
नागपूर : श्रावण महिन्यापासून सण मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. याच काळात मिठाई, उपवासाचे पदार्थ, तयार व पॅकबंद पदार्थांची जास्त विक्री होते. याचा फायदा घेत व्यापारीही मोठ्या प्रमाणात अन्नपदार्थांमध्ये भेसळ करतात. अन्न व औषधी प्रशासन विभागाकडे कमी मनुष्यबळ म्हणजेच नागपूर जिल्ह्यासाठी केवळ दहा अन्न सुरक्षा अधिकारी असल्यामुळे ४० लाख लोकसंख्येच्या नागपूर जिल्ह्यात अधिकारी कुठे कुठे कारवाई करणार, हा गंभीर प्रश्न आहे. आपल्या खाद्यपदार्थांत भेसळखोरांनी विष तर कालवले नाही ना? हे नागरिकांनी स्वत:च तपासून घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
अन्न सुरक्षा आणि मानके कायद्यातील कलम ५० अन्वये विक्री केल्या जाणाऱ्या अन्नपदार्थांचा दर्जा योग्य नसल्यास पाच लाख, अन्नपदार्थांचे उत्पादन, साठवणूक आणि विक्री केल्यास पाच लाख आणि खोटी जाहिरात दिल्यास दहा लाखांपर्यंत दंडाची तरतूद आहे. मात्र, अन्न व औषध प्रशासन विभागाकडे मनुष्यबळ अगदीच कमी असल्यामुळे अन्नपदार्थ नमुने तपासण्याचे प्रमाण तुलनेत कमीच आहे. त्यामुळे भेसळखोरांचे फावत असल्याचे दिसून येत आहे. भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची नागरिकांची मागणी आहे. सणांच्या काळात भेसळ करणारे व्यापारी का सक्रिय होतात आणि त्यांची दुकाने सील का करीत नाहीत, असाही नागरिकांचा प्रश्न आहे.
आठ महिन्यांत अधिकाऱ्यांनी तपासणीसाठी घेतले ३६७ नमुने, ४६ असुरक्षित
यावर्षी जानेवारी ते ऑगस्टपर्यंत अन्न व औषधी विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करून ३६७ नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले. हे सर्व नमुने शासकीय आणि विभागाच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले. या नमुन्यांपैकी १२२ नमुने प्रमाणित असल्याचे आढळून आले. याशिवाय १९ नमुने अप्रमाणित, पण सेवन केल्यानंतर शरीराला अपायकारक नसल्याचे आढळून आले. पाच नमुन्यांमध्ये योग्य अन्न घटक दिसून आले नाहीत, तर ४६ नमुने असुरक्षित अर्थात भेसळयुक्त असल्याचे सिद्ध झाले. तसेच १७५ नमुन्यांचा प्रयोगशाळेतून अजूनही अहवाल प्राप्त झाला नाही. असुरक्षित भेसळयुक्त नमुने प्राप्त केलेल्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
खरेदी करताना काळजी घ्या
ग्राहकांना वर्षभर वस्तू योग्यरीत्या हाताळून खरेदी करण्याची गरज आहे. श्रावण महिन्यापासून महत्त्वाच्या सणांना सुरुवात होते. या दरम्यान तेल, दूध, खवा, दुग्धजन्य पदार्थ, पीठ, साखर, तूप यासारख्या खाद्यपदार्थांच्या विक्रीत अचानक वाढत होते. या संधीचा फायदा घेत व्यापारी खाद्यपदार्थांत भेसळ करतात. त्यामुळे नागरिकांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. नागरिकांनी भेसळीची तक्रार केल्यास विभागातर्फे निश्चितच कारवाई करण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
सणासुदीच्या काळात जास्त भेसळ
सणासुदीच्या काळात हॉटेल्समध्ये मिळणाऱ्या विविध स्वरूपातील तयार खाद्यपदार्थांच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ होते. त्यामुळे या खाद्यपदार्थांमध्ये भेसळ होण्याचा प्रकारही वाढीस लागतो. तो रोखण्यासाठी अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांकडून या काळात तपासणीला वेग दिला जातो.
सणासुदीच्या दिवसांत वाढतात कारवाया
सणासुदीच्या काळात जीवनावश्यक वस्तू व अन्नपदार्थांची विक्री वाढते. सोबतच अन्न व औषधी प्रशासन विभागाचा कारवाईचा वेग वाढतो. त्याबरोबर नागरिकांनीही सजग राहण्याची गरज आहे. विभागातर्फे वेळोवेळी नागरिकांना भेसळयुक्त अन्नपदार्थांची माहिती देण्यात येते. नागरिकांना शंका आल्यास थेट विभागाच्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येते. विभाग कारवाईसाठी कटिबद्ध आहे.
आनंद महाजन, अन्न सुरक्षा अधिकारी.