डिझेल संपले बस थांबली
By Admin | Published: September 15, 2015 06:12 AM2015-09-15T06:12:37+5:302015-09-15T06:12:37+5:30
शहरातील स्टार बस सेवेबाबत नेहमीच आरडाओरड सुरू असते. यात स्टार बसचा आणखी एक प्रताप उघडकीस आला
नागपूर : शहरातील स्टार बस सेवेबाबत नेहमीच आरडाओरड सुरू असते. यात स्टार बसचा आणखी एक प्रताप उघडकीस आला आहे. डिझेल संपल्याने, स्टार बस रस्त्यातच बंद पडली. इंदोरा येथे सोमवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेमुळे वाहतूक व्यवस्था तर खोळंबलीच परंतु प्रवासी व विद्यार्थ्यांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला.
सोमवारी सायंकाळी ५.३० वाजता एमएच-३४ सीए -६२२३ या क्रमांकाची सीताबर्डी ते नारी ही स्टार बस प्रवाशांना घेऊन निघाली. सायंकाळची वेळ असल्याने या बसमध्ये नोकरवर्ग, कामगार, विद्यार्थ्यांची संख्या मोठी होती. ते सर्व घराकडे परत निघाले होते. दरम्यान सायंकाळी ६ वाजता इंदोरा चौकात बस बंद पडली. बराच प्रयत्न करूनही बस सुरू होत नसल्यामुळे प्रवाशांनी विचारणा केली परंतु काहीच समाधानकारक उत्तर मिळाले नाही. दरम्यान चौकातच बस उभी झाल्याने वाहतूकही खोळंबली. बस बिघडली असेल म्हणून प्रवासी विद्यार्थ्यांनी खाली उतरवून बसला धक्का मारण्याचाही प्रयत्न केला. परंतु तरीही बस सुरू झाली नाही. अखेर डिझेल संपल्याचे चालकाने सांगितले. चालक व कंडक्टरने डिझेलसाठी धावपळ केली. यात अर्धा तास निघून गेला. अर्ध्या तासाने डिझेल आणून बसमध्ये टाकण्यात आले आणि बस सुरू झाली. परंतु या वेळात इंदोरा चौकात बघ्याची चांगलीच गर्दी झाली होती. वाहतूकही खोळबंली होती आणि घरी जाण्याच्या घाईत असलेल्या विद्यार्थी व प्रवाशांना मात्र मनस्ताप सहन करावा लागला. (प्रतिनिधी)
ही गंभीर बाब आहे
स्टार बस ही शहरातील सार्वजनिक वाहतूक सेवा पुरविण्याचे काम करते. त्यामुळे त्यांच्या बसेस या ग्राहकांच्या सोयीनुसार चांगल्या असायलाच हव्या. स्टार बसेस लोकांच्या बसण्यासारख्या राहिल्या नाहीतच. परंतु आता वाहनात डिझेलही व्यवस्थित भरले जाते किंवा नाही, अशी शंका निर्माण झाली आहे. डिझेल संपणार असल्याची माहिती चालकाला नव्हती का? असाही प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे हा साधा विषय नाही. महापालिका प्रशासनाने याची दखल घ्यावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे बाळू घरडे यांनी केली आहे.