नागपूर विभागात आता धावणार नाही डिझेल इंजिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2020 08:20 PM2020-08-19T20:20:09+5:302020-08-19T20:20:56+5:30

आता मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात एकही डिझेल इंजिन रेल्वे रुळावर धावताना दिसणार नाही.

Diesel engine will no longer run in Nagpur division | नागपूर विभागात आता धावणार नाही डिझेल इंजिन

नागपूर विभागात आता धावणार नाही डिझेल इंजिन

googlenewsNext
ठळक मुद्देमध्य रेल्वेच्या नागपूर विभागात १०० टक्के विद्युतीकरण

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एकेकाळी वाफेवर रेल्वे इंजिन धावत होते. त्यानंतर डिझेल इंजिनाचा शोध लागला. परंतु त्यामुळे होणारे प्रदूषण पाहता इलेक्ट्रिक इंजिनाचा पर्याय समोर आला. परंतु मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात बहुतांश ठिकाणी डिझेल इंजिन धावत होते. हळूहळू विद्युतीकरणाचे काम हाती घेण्यात आले. बहुप्रतीक्षित वणी- पिंपळखुटी मार्गावरही विद्युतीकरण करण्यात आल्यामुळे आता मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात एकही डिझेल इंजिन यापुढे रुळावर दिसणार नाही.

मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात यवतमाळ जिल्ह्यातील वणी-पिंपळखुटी या एकमेव मार्गावर डिझेल इंजिन धावत होते. परंतु अलीकडेच या मार्गाचे विद्युतीकरण करण्यात आले आहे. यापूर्वी या मार्गावर वीज नसल्याने वणी रेल्वेस्थानकावर रेल्वेगाडीला डिझेल इंजिन जोडण्यात येत होते. डिझेल इंजिनामुळे रेल्वेगाड्यांचा वेग खूपच कमी राहत असल्यामुळे प्रवास कंटाळवाणा वाटत होता. नागपूर रेल्वेस्थानकावरून गाडी सुटल्यानंतर सेवाग्राम, माजरी, वणी, पिंपळखुटी, आदिलाबाद या मार्गाने तेलंगणात जात होती. आता या मार्गावर विद्युतीकरण झाल्यामुळे रेल्वेगाडीचा वेग वाढला असून प्रवाशांना वेळेत आपल्या गावाला पोहोचता येणार आहे. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे कार्यक्षेत्र पिंपळखुटीपर्यंत आहे. पिंपळखुटी ते आदिलाबाद हा भाग दक्षिण-मध्य रेल्वेच्या अंतर्गत येतो. या मार्गावरही विद्युतीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. वणी-पिंपळखुटी या मार्गावर विद्युतीकरण झाल्यामुळे आता मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात एकही डिझेल इंजिन रेल्वे रुळावर धावताना दिसणार नाही.

मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात १०० टक्के विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे यानंतर रेल्वे रुळावर एकही डिझेल इंजिन धावताना दिसणार नाही.
- सोमेश कुमार, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, मध्य रेल्वे, नागपूर विभाग.

 

Web Title: Diesel engine will no longer run in Nagpur division

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.