नागपुरात डिझेलची दरवाढ शंभरीकडे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2021 09:23 PM2021-06-08T21:23:33+5:302021-06-09T00:08:57+5:30
Diesel price hike पेट्रोल आणि डिझेलच्या किमती दरदिवशी वाढतच आहे. सोमवारी पेट्रोल प्रति लिटर १०१.३६ रुपये तर डिझेल ९२.०३ रुपयांवर पोहोचले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पेट्रोल आणि डिझेलच्या किमती दरदिवशी वाढतच आहे. सोमवारी पेट्रोल प्रति लिटर १०१.३६ रुपये तर डिझेल ९२.०३ रुपयांवर पोहोचले आहे. इंधनच्या किमती अशाच वाढत राहिल्यास पेट्रोलप्रमाणे डिझेलही पुढील महिन्यात शंभरी गाठण्याची शक्यता आहे. पेट्रोलने २९ मे रोजी शंभरी गाठली होती, हे विशेष. याशिवाय पॉवर पेट्रोल १०४.८० रुपये आणि टर्बो डिझेलची किंमत ९५.२९ रुपये आहे.
३१ मे रोजी डिझेलचे दर ९०.९२ रुपये होते, तर ७ जून रोजी ९२.०३ रुपयांवर पोहोचले. त्यातच एक महिन्यात डिझेलच्या दरात प्रति लिटर तब्बल ४.६६ रुपयांची वाढ झाली आहे. पेट्रोलच्या वाढत्या किमतीने सर्वसामान्य त्रस्त आहेत, तर दुसरीकडे डिझेलच्या वाढत्या दराने लक्झरी आणि महागड्या गाड्या खरेदी करणाऱ्यांवर परिणाम झाला आहे. कमी किमतीच्या कार मध्यमवर्गीय खरेदी करतात. त्याचा परिणाम सामान्यांनाही बसला आहे. शिवाय मालवाहतुकीचे दर वाढल्याने भाज्या, धान्य, दूध, किराणा आणि दैनंदिन गरजेच्या वस्तू महाग होण्याची शक्यता आहे.
तज्ज्ञांनी सांगितले की, जगभरात कोरोना महामारीचा परिणाम कमी झाला आहे. अर्थव्यवस्था खुली झाली आहे. पेट्रोलियम पदार्थांची मागणी वाढली आहे. त्यामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्याच कारणांनी भारतातही पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढत आहेत. दुसरीकडे केंद्र आणि राज्य सरकार करात सवलत देतील, अशी शक्यता नाही. कोरोना दुसऱ्या लाटेचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे. सरकार त्याची भरपाई पेट्रोल आणि डिझेल करवाढीच्या माध्यमातून काढत आहे.
डिझेलच्या वाढत्या दराचा तक्ता :
२५ मे ९०.०६
२७ मे ९०.३६
२९ मे ९०.६५
३१ मे ९०.९२
१ जून ९१.१६
५ जून ९१.४५
६ जून ९१.७५
७ जून ९२.०३
८ जून ९२.०३