देहदान, अवयवदान हे राष्ट्रकार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 01:02 AM2017-11-13T01:02:24+5:302017-11-13T01:02:57+5:30

संविधानाला राष्ट्रीय ग्रंथ मानला जातो. संविधानाने समता, बंधूता, धर्मनिरपेक्षता ही मूल्ये मांडली आहेत.

Diet, organism, nationalism | देहदान, अवयवदान हे राष्ट्रकार्य

देहदान, अवयवदान हे राष्ट्रकार्य

googlenewsNext
ठळक मुद्देउपराजधानीत रुजतेय चळवळ : जनजागृतीचा अभाव असल्याची व्यक्त केली खंत

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : संविधानाला राष्ट्रीय ग्रंथ मानला जातो. संविधानाने समता, बंधूता, धर्मनिरपेक्षता ही मूल्ये मांडली आहेत.
ही मूल्ये देशातील प्रत्येक नागरिकांनी जपल्यास संविधानाचा उद्देश सार्थकी लागेल. समाजजीवनात वावरताना या मूल्यांचा ºहास होताना दिसतो आहे. परंतु देहदान, अवयवदानातून आपल्याला ही मूल्ये जपता येतात. आपले शरीर कुणाच्या तरी कामी आले पाहिजे, ही भावना बंधूता निर्माण करणारी आहे. समाजात स्त्री-पुरुष, जातीधर्मात विषमता आहे, अवयवदान केल्यास ही विषमता दूर होऊ शकते आणि अवयवदान ही धर्माच्या पलीकडे जाण्याची प्रेरणा देते. मृत्यूनंतरही हा देह मानवाच्या कल्याणासाठी उपयोगी पडावा, ही प्रेरणा केवळ देहदान व अवयवदानातून निर्माण होते.
त्यामुळे देशातील प्रत्येकाने देहदान, अवयवदानासाठी राष्ट्रकार्य म्हणुन पुढे यावे, अशी भावना देहदान, अवयवदानाच्या चळवळीत कार्य करणाºयांनी लोकमत व्यासपीठावर व्यक्त केली.

देहदान कशासाठी?
संपूर्ण भारतात ५ लाख ४२ हजार ८२० हेक्टर जागा ही स्मशानभूमीत गुंतली आहे. हे क्षेत्रफळ म्हणजे किमान १० नागपूर बसू शकतात एवढे आहे. १९८८ च्या सरकारी रेकॉर्डनुसार देह जाळण्यासाठी वर्षाला दोन कोटी झाडे तोडली जातात. उच्च न्यायालयाच्या एका निर्णयानुसार एका झाडाची किंमत २३ लाख रुपये आहे. त्यामुळे राष्ट्राची मोठी संपत्ती अंत्यसंस्कारात खर्च होत आहे. मोठ्या प्रमाणात पाणी प्रदूषण, हवेचे प्रदूषण अंत्यसंस्कारामुळे होते. गंगा नदीच्या प्रदूषणात मोठा वाटा अंत्यसंस्काराचा आहे, शिवाय अंत्यसंस्कारासाठी होणारा खर्च या सर्वांचा व्यापक विचार केल्यास देहदान महत्त्वाचे आहे.
काय आहेत अडचणी
वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी १९९६ मध्ये २०,००० मृत शरीराची गरज होती. सरकारी आकडेवारीनुसार केवळ ३०० मृत शरीर तेव्हा उपलब्ध होते. डॉक्टर हा समाजातील महत्त्वाचा घटक आहे. त्याचे प्रशिक्षण जर योग्य पद्धतीने झाल्यास, त्याच्या कार्याच्या कक्षा वाढू शकतात. आज नागपूर शहराचा विचार केल्यास तीन वैद्यकीय महाविद्यालये आहेत. जवळपास ५०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. परंतु त्यांना अभ्यासासाठी केवळ ३० ते ४० मृत शरीर उपलब्ध आहेत. यात अडचणी म्हणजे जनजागृतीचा अभाव आहे. कायदा आहे पण अंमलबजावणी व्यापक नाही. प्रशासकीय हलगर्जीपणा आहे. सरकारची मानसिकता नाही.
आवाहन
करू या आपण पुण्य महान, देऊनी स्वत:चे देहदान, करता येईल तुम्हाला सहज, देहदान ही नवयुगाची गरज...हा संकल्प सिद्धीस न्यायचा असेल तर देहदान सेवा संस्था आपल्याला सहकार्य करू शकते. चंद्रकांत मेहर यांचे या कार्यात महत्त्वाचे योगदान असून, त्यांना ९२४००२९२७४ या क्रमांकावर संपर्क करू शकता.
काय अपेक्षा आहेत चळवळीतील कार्यकर्त्यांची
डॉ. चंद्रकांत मेहर यांनी १९८५ मध्ये नागपुरात देहदानाची संकल्पना रुजविली. यातून काही कार्यकर्तेही त्यांनी जोडले. चळवळ वाढली, लोकांनी देहदानाचे संकल्पही केले. त्यांनीही देहदानात पीएच.डी. केली, मात्र अजूनही त्यात व्यापकता आली नाही. त्यात रूढी, परंपरा अडचणीच्या ठरत आहेत. कायद्याची अंमलबजावणी कठोर होणे गरजेचे आहे. लोकांमध्ये स्वत:हून मानसिकता तयार होणे गरजेचे आहे.
इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयाचे अ‍ॅनाटॉमी विभागाचे डॉ. यशवंत कुळकर्णी यांच्या मते, गेल्या दोन वर्षांत देहदानाचे फॉर्म दोन हजारावर लोकांनी भरले. पण प्रत्यक्षात १५ ते २० लोकांचेच देहदान झाले. देहदानाचा संकल्प सिद्धीस नेण्याची गरज आहे.
डॉ. सतीश कदम यांनी वृत्तपत्रांमध्ये बातमी वाचून वडिलांचे देहदान केले. नातेवाईकांकडून थोडा विरोध झाला, मात्र संकल्प सिद्धीस नेला. वडिलांच्या तेरवीला त्यांनी लोकांना जेवण दिले नाही तर अवयवदान, देहदान, नेत्रदान यावर डॉक्टरांची चर्चासत्रे आयोजित केली आणि तेरवीला येणाºयांना यासंदर्भात प्रबोधन केले. ते दरवर्षी फ्रेंडशिप डे निश्चय दिवस म्हणून साजरा करतात. पाच वर्षांपासून ते या चळवळीत कार्यरत आहेत.
आदर्श शिक्षक पुरस्काराने पुरस्कृत मधुकर धंदरे गुरुजी हे १९८७ पासून चळवळीशी जुळले आहेत. त्यांनी शिक्षकदिनाला स्वत:चे नेत्रदान व देहदानाचा संकल्प केला आणि या विषयावर ते प्रबोधन करून लोकांना प्रेरित करतात.
शिक्षकीपेशात कार्यरत असलेले डॉ. सुशील मेश्राम यांचे देहदान-अवयवदानावर अव्याहतपणे कार्य सुरू आहे.४०० विद्यार्थिनींकडून त्यांनी संकल्पपत्र भरून घेतले. आपल्या कुटुंबातील दोन वर्षांच्या मुलापासून ७८ वर्षांच्या वडिलांपर्यंत अशा २८ सदस्यांचे संकल्पपत्र भरून घेतले. त्यांच्या मते, संविधानाची मूल्ये रुजवायची असेल तर हे कार्य अतिशय महत्त्वाचे आहे.
स्वत:च्या आईचे व पत्नीचे देहदान करून मदन नागपुरे यांनी चार वर्षांपासून ८५ लोकांकडून देहदानाचे संकल्पपत्र भरून घेतले. सरकारने सफाई अभियानासारखे देहदान अभियान ही संकल्पना राबवावी, अशी त्यांची अपेक्षा आहे.
प्रमोद भीष्म हे कर्मठ ब्राह्मण. आजोबा, पणजोबा, वडील हे भिक्षुकी करायचे. मृत्यूनंतरचा धर्म सोपस्कार ते पार पाडायचे. परंतु प्रमोद भीष्म यांनी त्याला छेद देत माणसाला परत का मारायचे, ही भावना ठेवून आणि देहदानाचे महत्त्व लक्षात घेऊन त्यांनी वडिलांचे देहदान के ले. आज भीष्म कुटुंबातील सर्वांनीच देहदानाचा संकल्प केला आहे.

Web Title: Diet, organism, nationalism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.