नागपूरच्या अर्थसंकल्पात धूळफेक; योजना कागदावरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2019 11:27 AM2019-06-27T11:27:07+5:302019-06-27T11:28:39+5:30
‘आमदनी अठन्नी, खर्चा रुपैया’या म्हणीप्रमाणे महापालिकेचा कारभार आहे. गेल्या एक दशकात सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पांचे अवलोकन केले तर प्रत्यक्ष उत्पन्न व अपेक्षित उत्पन्नाच्या आकड्यात मोठी तफावत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘आमदनी अठन्नी, खर्चा रुपैया’या म्हणीप्रमाणे महापालिकेचा कारभार आहे. गेल्या एक दशकात सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पांचे अवलोकन केले तर प्रत्यक्ष उत्पन्न व अपेक्षित उत्पन्नाच्या आकड्यात मोठी तफावत आहे. स्थायी समितीचे अध्यक्ष प्रदीप पोहाणे यांनी सादर केलेल्या वर्ष २०१९-२० च्या अर्थसंकल्पातही असाच प्रकार आहे. ३१९७.६० कोटींचा अर्थसंकल्प सादर केला. मात्र उत्पन्नाचे स्रोत विचारात घेता उद्दिष्ट साध्य होण्याची शक्यता दिसत नाही.
अर्थसंकल्पात घोषणा केली जाते, परंतु त्यानुसार उत्पन्न होत नसल्याने जवळपास ६० टक्के योजनांची अंमलबजावणी होत नाही. महापालिके च्या उत्पन्नाचा अर्धा वाटा वेतन, पेन्शन, वीज, पाणी व मालमत्तांची देखभाल यावर खर्च होतो. त्यानंतर शिल्लक रकमेतून विकास कामे केली जातात. परंतु अर्थसंकल्पात अपेक्षित उत्पन्नाच्या तुलनेत ३० ते ४० टक्के उत्पन्न कमी असते. अशा परिस्थितीत विकास कामासाठी १० ते २० टक्के निधी शिललक असतो. याचा विचार केला तर सादर केलेला अर्थसंकल्प ही धूळफेकच म्हणावी लागेल.
वर्ष २०१२-१३ चा महापालिकेच्या स्थायी समितीचा प्रस्तावित अर्थसंकल्प ११२८ कोटींचा होता. प्रत्यक्ष उत्पन्न ९४० कोटी होते. यात १८० कोटींची तफावत होती. वर्ष २०१८-१९ मध्ये २९४६ कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला, तर उत्पन्न २०१७.७५ कोटी झाले. अर्थसंकल्प व प्रत्यक्ष उत्पन्न यात ९२८.२५ कोटींची तफावत होती. यावेळी प्रदीप पोहाणे यांनी ३१९७.६० कोटींचा अर्थसंकल्प मांडला. प्रत्यक्ष उत्पन्न तितके होईल का, हा संशोधनाचा भाग आहे.