फरक हेअर स्टाईलमध्येच!
By admin | Published: July 27, 2014 01:27 AM2014-07-27T01:27:22+5:302014-07-27T01:27:22+5:30
कनक आणि कस्तुरी म्हणजे जुळ्या मुली. या दोघींच्या सारख्या दिसण्याने अनेकांचा गोंधळ उडतो. नेमकी कनक कोण आणि कस्तुरी कोण, याचा पेच लोकांना पडताना पाहून आई-वडिलांची हसून हसून तारांबळ उडते.
शेजारी आणि नातेवाईकांची तरीही फसगत ठरलेलीच
नागपूर : कनक आणि कस्तुरी म्हणजे जुळ्या मुली. या दोघींच्या सारख्या दिसण्याने अनेकांचा गोंधळ उडतो. नेमकी कनक कोण आणि कस्तुरी कोण, याचा पेच लोकांना पडताना पाहून आई-वडिलांची हसून हसून तारांबळ उडते. आता दोघीही मोठ्या झाल्या आहेत आणि त्यांना एकमेकांसारखे दिसायला आवडत नाही. त्यामुळेच त्यांच्या दिसण्यातही थोडा फरक झाला आहे. पण साधारणत: जुळ्या बहिणींचे स्वभाव सारखे असतात तसे मात्र कनक - कस्तुरीचे नाही. कनकला जोक्स आवडतात आणि कस्तुरीला कसलाच जोक्स केलेले आवडत नाहीत.
श्याम आणि अंजली निसाळ हे सुरेल दाम्पत्य कनक- कस्तुरीचे आई-वडील आहेत. घरातच संगीत असल्याने आणि घरीच संगीत विद्यालय असल्याने दोघींनाही संगीताची आवड आहे. दोघींची एक सवय मात्र सारखी आहे. दोघी एकमेकींशी खूप भांडतात पण झोपतात एकत्रच आणि उठायची वेळ सारखी.
संगीताची आवड दोघींनाही असल्याने दोघीही गिटार आणि सतार तसेच तबलाही शिकत आहेत. यातली कनक जरा मॉड आहे. तिला आधुनिक पेहराव आवडतो तर कस्तुरीला भारतीय -पाश्च्यात्त्य यांचे फ्युजन असलेले वस्त्र आवडतात. कनक भिडस्त, बडबड करणारी, मोकळीढाकळी तर कस्तुरी लाजाळूचं झाड, नेमकेपणानेच बोलणारी. पण कस्तुरी न बोलताही आपले काम काढून घेते, असे कनकचे मत आहे. दोघींनाही स्पोर्ट्सची आवड आहे. अॅथ्लेटिक्स, लाँग जम्प, खो-खो आणि एनसीसीत दोघीही सोबत होत्या. नुकत्याच त्या उत्तराखंडला ट्रेकिंग कॅम्पसाठी गेल्या होत्या. दोघींच्या भांडणाने कॅम्प मधले सारेच हैराण झाले होते. त्यांचे भांडण होऊ नये दोघींना वेगवेगळ्या खोलीत ठेवले होते.
आई अंजली म्हणाल्या, लहानपणी कस्तुरीने बदमाशी केली आणि बाबांचा मार कनकला खावा लागला होता. त्यावेळी बाबांनाच फरक कळला नव्हता. लहानपणी दोघींना औषध देताना तारांबळ उडायची. तेव्हा कनकच्या पायाला ओळखीसाठी लाल रिबिन बांधून ठेवली होती. दोघींनीही यंदाच आर. एस. मुंडले शाळेतून दहावी उत्तीर्ण केले आहे.
यात कनकला ८८ टक्के तर कस्तुरीला ८६ म्हणजे जवळपास सारखेच गुण मिळाले. दोघींच्याही मैत्रिणी वेगवेगळ्या आहेत. एकमेकींच्या ग्रुप्समध्ये त्या जातच नाही, त्यामुळे मैत्रिणींचा गोंधळ होण्याचा धोकाच नाही. सध्या दोघीही अकरावीत पं. बच्छराज व्यास विद्यालयात संगणक विज्ञान शिकत आहेत. पूर्वी होणारी फसगत मात्र आता होत नाही.