नागपुरात दोन कार्यालयांच्या कोरोना आकडेवारीत तफावत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2020 11:13 AM2020-09-23T11:13:56+5:302020-09-23T11:15:26+5:30
विभागीय आयुक्त कार्यालयाद्वारे रोज कोरोना अहवाल जाहीर केला जातो. सोमवारी जारी अहवालामध्ये नागपूर जिल्ह्यात ९४६४ कोरोना रुग्ण अस्त्विात असल्याची माहिती देण्यात आली होती. मनपा कार्यालय अहवालामध्ये १२ हजार २५० कोरोना रुग्ण अस्तित्वात असल्याची माहिती देण्यात आली होती.
फहीम खान
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहर व ग्रामीण भागातील कोरोना संक्रमण सर्वांसाठी चिंतेचा विषय झाले आहे. या काळात रुग्णांना चांगले उपचार उपलब्ध होतील अशी नागरिकांना प्रशासनाकडून अपेक्षा आहे. परंतु, सध्या प्रशासनामध्येच समन्वयाचा अभाव दिसून येत आहे. कोरोनाच्या एवढ्या दिवसानंतरही प्रशासन एकमेकांसोबत ताळमेळ ठेवण्यात अपयशी ठरत आहे.
विभागीय आयुक्त कार्यालयाद्वारे रोज कोरोना अहवाल जाहीर केला जातो. सोमवारी जारी अहवालामध्ये नागपूर जिल्ह्यात ९४६४ कोरोना रुग्ण अस्त्विात असल्याची माहिती देण्यात आली होती. त्यातील ५७६५ रुग्ण शहरातील तर, ३६९८ रुग्ण ग्रामीण भागातील होते. याशिवाय मनपा कार्यालयही रोज सायंकाळी अहवाल जाहीर करते. त्यांनी सोमवारी जाहीर केलेल्या अहवालामध्ये शहरात १२ हजार २५० कोरोना रुग्ण अस्तित्वात असल्याची माहिती देण्यात आली होती. दोन्ही आकडेवारीत मोठा फरक होता. त्यामुळे कुणाची आकडेवारी खरी असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
कोरोनामुक्त रुग्णांतही तफावत
या दोन कार्यालयांच्या अहवालामध्ये कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांच्या आकडेवारीतही तफावत आहे. विभागीय आयुक्त कार्यालयानुसार आतापर्यंत शहरातील ४४ हजार १५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत तर, महानगरपालिका ३९ हजार ३७६ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याचे सांगत आहे.